Eknath Shinde On State Budget Session : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुतीच्या सरकारकडून विरोधकांना चहापानाचं आमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र, विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकत्रित पत्रकार परिषद पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी राज्यातील विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ‘विरोधकांचे आमदार कमी, पण पत्रच जास्त आलेत’, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. आता राज्यात महायुतीच्या सरकारचं हे दुसरं अधिवेशन आहे आणि निवडणुकीनंतर आता सरकारचा पहिला अर्थसंकल्प आहे. महायुती सरकारची टर्म नवीन असली तरी टीम जुनीच आहे. फक्त आमच्या दोघांच्या (एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस) खुर्चीची आदलाबदल झाली, पण अजित पवारांची खुर्ची फिक्स आहे”, अशी टोलेबाजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

“उपमुख्यमंत्री अजित पवार हे अर्थसंकल्प मांडणार आहेत. पण विरोधकांचं काय? विरोधकांचे आमदार कमी आहेत, पण पत्र जास्त आले आहेत. विरोधकांचा विरोधी पक्षनेता होऊ शकत नाही एवढं काम जनतेनं करून ठेवलं आहे. आता मी विरोधकांवर टीका करत नाही. मात्र, आम्ही चांगलं काम केलं आहे. त्यामुळे पु्न्हा जनतेनं आम्हाला बहुमत दिलं. आम्हाला बहुमत मिळालं असलं तरी आम्ही हुरळून जाणार नाहीत. आम्ही चांगलं काम करणार आहोत. आरोपांना आम्ही कामाने उत्तर दिलेलं आहे आणि यापुढेही कामानेच उत्तर देणार आहोत”, असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.

“अधिवेशनात विरोधक सभागृहात कमी आणि पायऱ्यांवर जास्त असतात. पण हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. लोकांनी आम्हाला आमच्या कामांची पावती म्हणून बहुमत दिलं आहे. लाडक्या बहि‍णींसारख्या अनेक योजना आम्ही सुरु केल्या आहेत. सर्वसामान्य लोकांच्या जीवनात बदल घडवण्याचं काम केलं. यापुढेही राज्याला पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही करणार आहोत”, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

अजित पवार काय म्हणाले?

“आम्ही अधिवेशनात प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची आमची तयारी आहे. महायुतीचं सरकार चांगलं चालावं यासाठी आमचा सर्वांचा प्रयत्न आहे. राज्य विधिमंडळाचं हे अर्थसंकल्पीय अधिवेशन चार आठवडे चालणार आहे”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dcm eknath shinde criticism to mahavikas aghadi politics and state budget session in mumbai gkt