सांगली : शिराळा येथे बाह्यवळण रस्त्यावरील पुलाखाली बेवारस व्यक्तीचा खून करून मृतदेह ट्रॅव्हल बॅगमध्ये ठेवण्यात आल्याचे सोमवारी आढळून आले. पुलाखालून दुर्गंधी येउ लागल्याने खूनाचा प्रकार उघडकीस आला असून मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. बाह्यवळण रस्त्यावरील पुलाखालून दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलीसांना नागरिकांनी दिली.

हेही वाचा >>> अपहार प्रकरणी जिल्हा बॅंकेचे तीन कर्मचारी निलंबित

पोलीसांनी तातडीने घटनास्थळी जाउन पाहणी केली असता ट्रॅव्हल बॅगमध्ये अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. सतरंजीमध्ये गुंडाळलेल्या स्थितीत मृतदेह ठेवण्यात आला होता. त्याच्या गळ्याभोवती आणि शरीराभोवती नॉयलॉन दोरीने बांधण्यात आले होते. कुजलेला मृतदेह असल्याने काही अवयव पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यानंतर तात्काळ अंत्यविधी करण्यात आला. या प्रकरणी शिराळा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगलीसह सातारा कोल्हापूर जिल्ह्यात बेपत्ता असलेल्यांची माहिती घेण्यात येत आहे.