"फक्त तीन टक्के लोकांना शिकवणाऱ्या सरस्वतीची पूजा कशासाठी?", भुजबळांच्या वक्तव्यावर फडणवीस म्हणाले, "हे सरकार..." | Devendra Fadnavis comment on Chhagan Bhujbal statement on Saraswati Photo in School | Loksatta

“फक्त तीन टक्के लोकांना शिकवणाऱ्या सरस्वतीची पूजा कशासाठी?”, भुजबळांच्या वक्तव्यावर फडणवीस म्हणाले, “हे सरकार…”

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शाळांमधील सरस्वती फोटोवरून केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

“फक्त तीन टक्के लोकांना शिकवणाऱ्या सरस्वतीची पूजा कशासाठी?”, भुजबळांच्या वक्तव्यावर फडणवीस म्हणाले, “हे सरकार…”
छगन भुजबळ, देवेंद्र फडणवीस

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी “सर्व शाळांमध्ये महापुरुषांचे फोटो असावेत. फक्त तीन टक्के लोकांना शिकवलं आणि आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवणाऱ्या सरस्वतीची पूजा कशासाठी करायची?” असं वक्तव्य केलं. यानंतर राजकीय वादाला सुरुवात झाली आहे. आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्रकारांनी विचारलं. त्यावर फडणवीसांनी हे सरकार कुठल्याही परिस्थितीत सरस्वतीचा फोटो हटवणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली. ते मंगळवारी (२७ सप्टेंबर) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जर असं कुणी म्हटलं असेल तर ते अतिशय चुकीचं आहे. सरस्वती विद्येची देवता आहे. सरस्वती कलेची देवता आहे. आमच्या संस्कृतीत हा सरस्वतीचा मान आहे. ज्याला भारतीय संस्कृती मान्य नसेल, परंपरा मान्य नसतील आणि हिंदुत्व मान्य नसेल असाच व्यक्ती असं बोलू शकतो.”

“हे सरकार कुठल्याही परिस्थितीत सरस्वतीचा फोटो हटवणार नाही”

“छगन भुजबळ काय बोलले हे मी ऐकलेलं नाही. त्यामुळे न ऐकता मी त्यांच्यावर टीका करणार नाही. मात्र, अशाप्रकारे मागणी करणं चुकीचं आहे. महापुरुषांचे फोटो लावा, पण त्यासाठी सरस्वतीचा फोटो हटवण्याची गरज काय? हे सरकार कुठल्याही परिस्थितीत सरस्वतीचा फोटो हटवणार नाही,” असं मत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलं.

“शिवभोजन थाळी बंद करण्याचा निर्णय नाही”

शिंदे फडणवीस सरकारने शिवभोजन थाळी बंद केल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. यावर फडणवीस म्हणाले, “शिवभोजन थाळी बंद करण्याचा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही. मात्र, शिवभोजन थाळीबाबतच्या तक्रारींची चौकशी होईल. त्याचा आढावा निश्चितपणे घेतला जाईल.”

“मराठा समाजातील मुलांचे नियुक्तीपत्र रोखण्यात आले होते”

मराठा समाजातील युवकांच्या नियुक्तीबाबतही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “मराठा समाजातील मुलांचे नियुक्तीपत्र रोखण्यात आले होते. सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही त्यांना नियुक्ती देण्यात आली नव्हती. मागच्या सरकारकडे ते सातत्याने मागणी करत होते की अधिसंख्य पदं निर्माण करून आम्हाला नियुक्ती द्या. मात्र, मागच्या सरकारने ते काम केलं नाही.”

“मराठा तरुण-तरुणींना नियुक्ती दिली”

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील आमच्या सरकारने अधिसंख्य पदं निर्माण करून या मराठा तरुण-तरुणींना नियुक्ती दिली आहे. मंत्रीमंडळ बैठकीनंतर त्या सर्व नियुक्तीपत्रांचं वाटप मी, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी केलं आहे,” असंही फडणवीसांनी नमूद केलं.

हेही वाचा : प्रकल्प पळवापळवीतून मुंबई, महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा डाव; छगन भुजबळ यांचा आरोप

भुजबळ नेमकं काय म्हणाले?

आपल्या भाषणामध्ये छगन भुजबळ यांनी शाळांमध्ये फुले, आंबेडकर, शाहू यांचे फोटो लावले पाहिजेत कारण त्यांनी शिक्षणाचा अधिकार दिला असं विधान केलं. मात्र यावेळी त्यांनी हिंदू देवींच्या फोटोंचा उल्लेख केला. “शाळेमध्ये सुद्धा सावित्रीबाई फुलेंचा फोटो लावला पाहिजे. महात्मा फुलेंचा लावला पाहिजे. शाहू महाराजांचा फोटो लावा पाहिजे. बाबासाहेबांचा लावा फोटो. कर्मवीर भाऊराव पाटलांचा लावा. सरस्वतीचा फोटो, शारदा मातेचा फोटो लावतात. जिला आम्ही कधी पाहिलं नाही. जिने आम्हाला काही शिकवलं नाही. असेलच शिकवलं तर फक्त तीन टक्के लोकांना शिकवलं आणि आम्हाला दूर ठेवलं तर त्यांची पूजा कशासाठी करायची?” असं विधान छगन भुजबळ यांनी केलं.

“हे तुमचे देव असले पाहिजे…”

“मला काही कळत नाही. अरे ज्यांनी तुम्हाला दिलं ते हे सगळे इथे आहेत,” असं भुजबळ यांनी मंचावरील महापुरुषांच्या फोटोंकडे पाहत म्हटलं. पुढे बोलताना भुजबळ यांनी, “यांच्यामुळेच तुम्हाला शिक्षण मिळालं. अधिकार मिळाले आणि सगळं मिळेल. यांची पूजा करा हे तुमचे देव असले पाहिजेत. यांना देव समजून यांची पूजा झाली पाहिजे. यांच्या विचारांची पूजा झाली पाहिजे. बाकीचे देव-बीव आहेत ते नंतर बघूयात,” असंही म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-09-2022 at 18:38 IST
Next Story
“हा त्यांना दिलासा नाही, इथे फक्त..”, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया!