Devendra Fadnavis आज महायुतीची जी पत्रकार परिषद पार पडली त्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार उत्तर दिलं आहे. तसंच उद्धव ठाकरेंनी जी टीका केली त्याचाही त्यांनी समाचार घेतला. मराठी माणसाचं पोट भाषणं देऊन भरणार नाही असाही टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“मी उद्धव ठाकरेंचे आभार मानतो कारण त्यांनी ज्या प्रकारचा कारभार चालवला त्यामुळेच आमचं सरकार आलं. आम्हाला जी काही काम करायची संधी मिळाली ती त्यांच्यामुळेच मिळाली. पण मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की मराठी माणसाचं ते बोलतात मग पत्रा चाळीतल्या मराठी माणसाचं काय? बीडीडी चाळीतल्या मराठी माणसाचं काय? अभ्युदय नगरमधल्या मराठी माणसाचं काय? गिरगावातल्या मराठी माणसाचं काय? या मुंबईतून मराठी माणूस सोडून गेला त्याला ते (उद्धव ठाकरे) जबाबदार नाहीत? त्या मराठी माणसाला घर देण्याचं काम एकनाथ शिंदेंच्या सरकारने, आमच्या सरकारने केलं. मराठी माणसाचं पोट भाषणं देऊन भरणार नाही. मराठी माणसाच्या गोष्टी करायच्या आणि ‘धन्नासेठांच्या’ पाठिशी उभं राहायचं ही जी त्यांची नीती होती आज त्यांच्यापुढे हादेखील प्रश्न आहे की मुंबई महापालिकेच्या मराठी शाळा कुणी बंद केल्या? त्या सीबीएससीकडे कशा वळल्या? सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत. काळजी करु नका.” असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार उत्तर दिलं आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्याच काळात…
त्रिभाषा सूत्र जे नव्या शिक्षण धोरणात आलं आहे ते सूत्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच आलं आहे. रघुनाथ माशेलकर समिती नेमण्यात आली होती. पहिलीपासून हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा स्वीकारल्या जाव्यात असा अहवाल दिला. उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळाने तो अहवाल स्वीकारला. कॅबिनेट च्या बैठकीच्या निर्णयावर उद्धव ठाकरेंची सही आहे. आता उद्धव ठाकरे त्याचंच राजकारण करत आहेत. आम्ही वारंवार सांगितलं आहे की मराठी अनिवार्य आहे इतर कुठलीही भाषा तुम्ही शिकता. पण तुम्ही लक्षात घ्या यांचा विरोध हिंदीला आहे. भारतीय भाषेला विरोध आहे आणि इंग्रजीसाठी पायघड्या अंथरल्या जात आहेत. आम्ही जो निर्णय घेतला होता त्यात कुठलीही भारतीय भाषा अशी तरतूद केली होती. कुठल्या वर्गापासून ते सुरु करायचं? याबाबत मतमतांतरं आहेत. त्यामुळे आम्ही जाधव समिती नेमली आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर आम्ही त्रिभाषा सूत्र आणू. प्राथमिक दृष्ट्या जी चर्चा झाली त्यात त्यांनी तीन महिने अवधी मागितला आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. दरम्यान त्यांना उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत असं विचारलं असता ते क्षणाचाही विलंब न करता म्हणाले की माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत त्यांनी एकत्र रहावं.
उद्धव ठाकरेंनी मराठी माणसाचं नाव पुढे करुन कसं मराठी माणसालाच बाहेर काढलं याची दहा उदाहरणं..
उद्धव ठाकरेंना केवळ राजकारण करायचं आहे. मराठी माणसाचं नाव पुढे करुन उद्धव ठाकरेंनी कशाप्रकारे मराठी माणसालाच मुंबईच्या बाहेर काढलं याची माझ्याकडे दहा उदाहरणं आहेत. आता त्याच मराठी माणसाला मुंबईत परत आणण्याचं काम महायुती सरकारने केलं आहे. असंही देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेल्या महायुतीच्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
© IE Online Media Services (P) Ltd