शरद पवार यांनी काँग्रेसबरोबर जाण्यापेक्षा एनडीएत यावं असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदूरबारच्या सभेत बोलताना केले होते. त्यांच्या या विधानानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, यासंदर्भात आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी असा कोणताही प्रस्ताव दिला नसून त्यांचे विधान म्हणजे शरद पवारांच्या पक्ष विलनीकरणाच्या विधानावर दिलेली प्रतिक्रिया होती, असे ते म्हणाले. एएनआय वृत्तसंस्थेही बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“निवडणुकीनंतर छोट्या प्रादेशिक पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल, असे शरद पवार स्वत: म्हणाले होते. कारण या निवडणुकीत काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांचा पराभव होणार, हे त्यांच्या लक्षात आलं होतं. म्हणून त्यांही हे विधान केलं होतं. त्यांच्या या विधानावर पंतप्रधान मोदी यांनी आज प्रतिक्रिया दिली. त्यामुळे पंतप्रधान मोदींचे विधान म्हणजे काही दोन्ही पक्षांना एनडीएत येण्याचं निमंत्रण होतं, असं नाही. माध्यमांशी त्याचा चुकीचा अर्थ लावला”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पुढे बोलताना, माध्यमांनीही कोणत्याही विधानाचा अर्थ लावताना पूर्ण विधानाच्या आधारे त्याचा अर्थ लावला पाहिजे, असेही ते म्हणाले.

इतर राजकीय नेत्यांनीही दिली प्रतिक्रिया :

दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या विधानावर शरद पवारांसह इतरही काही राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. “पंतप्रधान मोदी यांनी कोणत्या अर्थाने हे विधान केलं, हे मला माहिती नाही. मात्र, माध्यमांमध्ये ज्यापद्धतीने त्यांचे विधान दाखवले जात आहे. तसं ते नक्कीच नाही. त्यांचं विधान चुकीच्या पद्धतीने दाखवलं जात आहेत”, असे अजित पवार म्हणाले. तर नरेंद्र मोदी एनडीएत येण्याचा प्रस्ताव देत असतील, तर ते हास्यास्पद आहे. मोदींच्या या प्रस्तावाचे उत्तर महाविकास आघाडी ४ जूनच्या निकालाने देईल, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली.

महत्त्वाचे म्हणजे या विधानावर शरद पवार यांनीही भाष्य केलं. “आज देशामध्ये संसदीय आणि लोकशाही पद्धत मोदींमुळे संकटात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक करून तुरुंगात टाकण्याची भूमिका घेतली गेली. केंद्र सरकारचा यात सहभाग असल्याशिवाय एवढी मोठी कारवाई होऊ शकत नाही. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, लोकशाही पद्धतीवर त्यांचा विश्वासच नाही. हा समज आता लोकांमध्येही पक्का झाला आहे. अशा लोकांबरोबर जाण्याचा निर्णय माझ्याकडून कधीही होणार नाही.” असे ते म्हणाले.

नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

दरम्यान, नंदूरबारमध्ये बोलताना पंतप्रधान मोदींनी शरद पवार यांना एनडीएत येण्याचा प्रस्ताव दिला. “छोटे छोटे प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन व्हायला पाहिजे, असे शरद पवार यांनी विधान केले होते. त्यांच्या विधानाचा अर्थ असा आहे की, नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना पक्षाने काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे मन तयार केले आहे. मात्र, मी त्यांना सांगतो ४ जूननंतर काँग्रेसबरोबर जाण्यापेक्षा आमच्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर या. सर्व स्पप्न पूर्ण होतील”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.