Devendra Fadnavis Maharashtra Assembly Session 2025 : विधीमंडळाचं अर्थसंकल्यीय अधिवेशन अंतिम टप्प्यात आलं आहे. या अधिवेशनात आज (मंगळवार, २५ मार्च) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विरोधकांमध्ये बराच वेळ शाब्दिक संघर्ष चालू होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड व काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर, प्रामुख्याने राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, महिला सुरक्षेच्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं. तसेच त्यांनी, “कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या प्रत्येकावर कडक कारवाई केली जाईल, असं ठणकावून सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणी आक्षेपार्ह बोललं तर आम्ही त्याच्यावर कडक कारवाई करू. कारण ते आमचं दैवत आहे. आमच्या दैवताचा अपमान आम्ही सहन करणार नाही. तसेच जितेंद्र आव्हाड काल विधानसभेत म्हणाले, कायद्याचं राज्य आणि लोकशाही कोसळली आहे, राष्ट्रव्यवस्था कोसळली आहे. मला समजलं नाही की ते नेमकं महाराष्ट्राबद्दल बोलत होते की बांगलादेशबद्दल बोलत होते. मी त्यांना विचारू इच्छितो की आधीच्या सरकारच्या काळात पत्रकारांना कसं तुरुंगात टाकलं होतं ते आठवतंय का?

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

दरम्यान, विरोधकांची महायुतीवर टीका व महायुती सरकारमध्ये सारं काही आलबेल नसल्याच्या दाव्यांवर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, “तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी आम्ही तिघे (मी, एकनाथ शिंदे अजित पवार) एकमेकांच्या पायात पाय घालणारे नाही. आम्ही एकमेकांच्या हातात हात घालून राज्यकारभार चालवणारे आहोत. अजित पवार हे दरडावून बोलतात त्यामुळे कोणी त्यांच्या वाटेला जात नाही. आम्ही दोघे मात्र मवाळ आहोत. मी आणि एकनाथ शिंदे मवाळ आहोत. आम्ही लेकूरवाळे सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जात असतो. त्यामुळे आमच्यावर अधिक लक्ष असतं. परंतु, मला या लोकांना सांगायचं आहे की तुम्ही कितीही काड्या घालण्याचा प्रयत्न केला, बांबूची लागवड केली तरी…(त्यानंतर फडणवीस काहीही न बोलता केवळ मिश्किल हसले)

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis says me eknath shinde ajit pawar three of us will develop state together asc