शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक आणि अध्यक्ष संभाजी भिडे हे सतत वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, विरोधी पक्षांनी संभाजी भिंडेवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. संभाजी भिडेंचा हा मुद्दा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गाजू लागला आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून विधानसभेत विरोधी पक्ष संभाजी भिडेंवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. आजही (२ ऑगस्ट) विरोधी पक्षांनी संभाजी भिडेंच्या अटकेची मागणी करत विधानसभेत गोंधळ घातला. अखेर याप्रकरणी, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन करत संभाजी भिडे यांच्यावरील कारवाईला सुरुवात झाली असल्याचं सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, संभाजी भिडे गुरुजी हे हिंदुत्वासाठी काम करतात. ते छत्रपती शिवाजी महाराजांशी आणि त्यांच्या किल्ल्यांशी बहुजनांना जोडण्याचं काम करतात. हे त्यांचं कार्य चांगलं आहे. परंतु, त्यांना महापुरुषांबद्दल अशा प्रकारची वक्तव्ये करण्याचा अधिकार कोणीही दिलेला नाही. त्यांनाच काय, दुसऱ्या कोणालाही अशा प्रकारचा अधिकार नाही. महापुरुषांबद्दल अशा प्रकारे वक्तव्ये केली तर कारवाई होईल.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, संभाजी भिडे यांनी अमरावतीत भाषण केले होतं. त्यात त्यांनी त्यांच्या सहकाऱ्याला पुस्तक वाचायला लावलं. कुराण अँड द फकीर हे पुस्तकही वाचायला लावलं. तिथे केलेल्या भाषणानंतर अमरावती बाजारपेठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २९ जुलै २०२३ रोजी संभाजी भिडे आणि अन्य दोन व्यक्तिंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा >> राज ठाकरेंचं भाषण सुरु असताना गर्दीतला एक जण म्हणाला ”आय लव्ह यू!”, उत्तर देत म्हणाले…

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, संभाजी भिडे यांना सीआरपीसीच्या कलम ४१ अ अंतर्गत नोटीस पाठवली आहे. पोलिसांनी संभाजी भिडे यांच्याशी संपर्क साधला आहे. तसेच त्यांनी नोटीस स्वीकारली आहे. याप्रकरणी त्यांची चौकशी होईल. अमरावतीतल्या त्यांच्या सभेचा व्हिडीओ उपलब्ध नाही. त्याचबरोबर समाजमाध्यमांवर जे व्हिडीओ फिरत आहेत, ते निरनिराळ्या ठिकाणचे व्हिडीओ आहेत. त्या व्हिडीओंचे व्हॉईस सॅम्पल्सही तपासले जातील आणि याप्रकरणी कारवाई होईल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis says sambhaji bhide has no right to make controversial statements about asc