ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा चांगलाच कलगीतुरा रंगताना सध्या पाहायला मिळत आहे. आधी देवेंद्र फडणवीसांनी पाटण्यात विरोधी पक्षांच्या झालेल्या बैठकीवरून उद्धव ठाकरेंना लक्ष्य केल्यानंतर उद्धव ठाकरेंनीही कार्यकर्त्यांच्या बैठकीतून देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं. आता त्यावर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंवर खोचक टीका करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नरेंद्र मोदी सरकारला नऊ वर्षं पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी चंद्रपूरमध्ये भाजपाकडून जाहीर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. तसेच, यावेळी त्यांनी शरद पवारांनाही लक्ष्य केलं.

“पवारांची ती मुत्सद्देगिरी आणि शिंदेंची गद्दारी?”

“१९७८ मध्ये शरद पवार हे वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातील ४० आमदार घेऊन बाहेर पडले होते. त्यांनी तेव्हाच्या भाजपाबरोबर सरकार स्थापन केलं. ते सरकार दोन वर्षं चाललं. पंतप्रधान इंदिरा गांधींनी ते सरकार बरखास्त केलं नसतं तर ते सरकार पाच वर्षं चाललं असतं. म्हणजे तेव्हा पवारसाहेबांनी जे केलं ती मुत्सद्देगिरी आणि तेच एकनाथ शिंदे यांनी केलं तर गद्दारी? असं कसं चालेल?” असा खोचक सवाल देवेंद्र फडणवीसांनी केला.

फडणवीस वि. ठाकरे कलगीतुरा!

दरम्यान, पाटण्यातील बैठकीवरून दोन दिवसांपूर्वी फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं होतं. “ही मोदी हटाव बैठक नसून परिवार बचाव बैठक” असल्याची टीका फडणवीसांनी केली होती. त्यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी ठाकरे गटाच्या कार्यक्रमात टीका केली. “देवेंद्रजी, एवढ्या पातळीवर येऊ नका. परिवार तुम्हालाही आहे. तुमच्याही परिवाराचे व्हॉट्सअॅप बाहेर येत आहेत, आलेले आहेत. आम्ही अजून त्यावर बोललोले नाही. जर तुम्हाला त्यावर बोलावं लागलं, तर तुम्हाला फक्त शवासन करावं लागेल”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

उद्धव ठाकरेंच्या या टीकेला आता पुन्हा देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “काल मी परिवारवादी पार्टी म्हणालो, तर उद्धव ठाकरेंना फारच झोंबलं. उद्धवजी, तुमको मिरची लगी, तो मै क्या करूँ? फारच झोंबलं. आधी ते मुख्यमंत्र्यांच्या नातवावर गेले होते, काल माझ्या पत्नीवर आले. उद्धव ठाकरे, मै काँच के घर में नहीं रहता. तुम काँच के घर में रहते हो, और काँच के घरों में रहनेवाले दूसरोंपर पत्थर नहीं फेंका करते”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

“पवारसाहेब तुम्ही केली तर मुत्सद्देगिरी आणि शिंदेंनी केली तर…”, फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल!

उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान

दरम्यान, यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान दिलं आहे. “आमचं जीवन खुली किताब आहे. माझं तुम्हाला जाहीर आव्हान आहे, मी किंवा माझ्या परिवाराबाबत तुमच्याकडे काहीही असलं, तरी उघड करून दाखवा. पण लक्षात ठेवा, देवेंद्र फडणवीस कुणाच्या भानगडीत पडत नाही,पण पडला तर सोडत नाही. त्यामुळे, एवढं लक्षात ठेवा, ज्याच्या कपाटात सांगाडे पडले आहेत, त्यांनी सावकारीचा आव आणण्याचं कारण नाहीये. सांगाडे नक्कीच बाहेर निघतील”, असा इशाराही फडणवीसांनी यावेळी दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis targets uddhav thackeray on family in chandrapur pmw