कराड : केंद्र व राज्य सरकारची ध्येयधोरणे अगदी सर्वसामान्य विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवणारा शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचा दुवा म्हणून प्राचार्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर विभागाचे विभागीय सहसंचालक डॉ. प्रकाश बच्छाव यांनी केले. विद्यानगर – सैदापूर (ता. कराड) येथील सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयात सातारा जिल्हा प्राचार्य असोसिएशनची बैठक संपन्न झाली. प्रशासनातील अडचणी समजावून घेण्यासाठी, विद्यार्थ्यांची वर्गातील उपस्थिती वाढवण्यासाठी आणि नवीन शैक्षणिक धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी ही विशेष बैठक आयोजिली होती. या वेळी डॉ. प्रकाश बच्छाव बोलत होते.
अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे बीसीयूडी संचालक प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे हे होते. या वेळी रयत संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य ॲड. रवींद्र पवार, येथील सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, कोल्हापूरच्या ताराराणी विद्यापीठाचे प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील, सातारचे ग्रंथप्रेमी साहित्यिक व प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ, प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील आदींची या महत्वपूर्ण बैठकीला उपस्थिती होती.
डॉ. प्रकाश बच्छाव म्हणाले, की नवीन शैक्षणिक धोरणामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले हे खरे आहे; पण, त्यातून निश्चितपणे मार्ग काढता येतो. शिक्षण ही एक महत्त्वाची चळवळ आहे. शासनाने मुलींना शिक्षण शंभर टक्के मोफत देण्याचे धोरण ठरवले आहे. यामध्ये पारदर्शकता आणूया. नवीन धोरणामुळे प्राध्यापकांचा कामाचा ताण (वर्क लोड) व वेतनश्रेणीचा प्रश्न आहे. विकसित भारत, ऑनलाइन भारत प्रणाली सुरू झाली आहे.
वर्गात विद्यार्थी कसा येईल, यासाठी नवनवीन योजना आपण सर्वांनी मिळून एकजुटीने अमलात आणल्या पाहिजेत. ही जबाबदारी कोणा एका नव्हेतर सर्व प्राचार्यांची आहे. या प्रसंगी कोल्हापूर विभागाचे विभागीय सहसंचालक नवीन रुजू झाल्याबद्दल सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय व प्राचार्य संघटनेतर्फे डॉ. प्रकाश बच्छाव यांचा सत्कार करण्यात आला. सातारा जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य या विशेष बैठकीला उपस्थित होते.