राज्यात झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा बुधवारी (८ फेब्रुवारी) विधानभवनात संपन्न झाला. यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी घेतलेली शपथ चर्चेतआहे. इतर सदस्य आपले वरिष्ठ नेते आणि श्रेष्ठींची नावे घेत असताना आमदार सत्यजीत तांबेंनी मात्र सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराज व फुले, शाहू, आंबेडकर या महापुरुषांची नावे घेतली. तसेच त्यांचे आजोबा भाऊसाहेब थोरात यांना वंदन करून शपथ घेतली. यानंतर सत्यजीत तांबेंचे वडील, माजी आमदार सुधीर तांबे यांनी हा शपथ घेतानाचा व्हिडीओ ट्वीट करत प्रतिक्रिया दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुधीर तांबे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर आणि सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांना वंदन करून सत्यजीतने आज विधानपरिषद सदस्यपदाची शपथ घेतली. मला विश्वास आहे की, सत्यजीत या पदाला योग्य न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. सत्यजीत, तुला पुढील वाटचालीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा.”

नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणूक राज्यात चर्चेचा विषय

दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक संपूर्ण राज्यात चर्चेत राहिली. सत्यजीत तांबेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर महाविकासआघाडीने शुभांगी पाटील यांना उमेदवारी दिली. मात्र, या चुरशीच्या लढतीत सत्यजीत तांबे भरघोस मतांनी निवडून आले.

हेही वाचा : “दादा, मी राजीनामा दिलेला आहे, तो माझा…”,अजित पवारांनी दिली बाळासाहेब थोरातांच्या फोनची माहिती

सत्यजीत तांबे यांनी आज अधिकृतरित्या विधिमंडळात प्रवेश केला. सत्यजीत तांबे हे पहिल्यांदाच विधान परिषदेवर निवडून आले आहेत. यापुढील विधिमंडळ कामकाजात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असणार आहे. त्यांना याआधी जिल्हा परिषद सदस्यपदाचा अनुभव आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr sudhir tambe tweet video of satyajeet tambe taking oath as mlc pbs