अहिल्यानगर : जिल्ह्याच्या बहुतांश भागाला सलग दोन दिवस पावसाने झोडपून काढले. काल, रविवारी २१, तर आज, सोमवारी १९ मंडलांत अतिवृष्टी झाली. नगर, पाथर्डी, शेवगाव व श्रीगोंदे तालुक्यातील काही गावांचा पुरामुळे संपर्क तुटला होता. पाथर्डीत २ तर नगर तालुक्यातील १ असे तिघेजण या पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. यापैकी दोघांचे मृतदेह सापडले असून एकाचा शोध सुरू आहे. दरम्यान पाथर्डीत पुराच्या पाण्यात वेढलेल्या १२७ जणांची बचाव पथकाने मुक्तता केली. जोरदार पावसाने अनेक घरांची पडझड झाली. जनावरे वाहून गेली, शेती खरवडून गेली, विजेचे खांबही वाहून गेले. खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील शाळांना सोमवारी सुटी जाहीर करण्यात आली होती.

पाथर्डी तालुक्यात घाटशील पारगाव येथे गणपत हरिभाऊ बर्डे (वय ६५) व हनुमान टाकळी येथे राजू बजरंग साळुंखे हे दोघे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती तहसीलदार डॉ. उद्धव नाईक यांनी दिली, तर नगर तालुक्यातील वाळुंज येथे प्रथमेश बाळू साळवे (वय २२) हा पुराच्या पाण्यात वाहून गेला. त्याचे पार्थिव सापडल्याची माहिती तहसीलदार संजय शिंदे यांनी दिली.

दरम्यान, हवामान विभागाने नगर जिल्ह्याला पुन्हा उद्या, मंगळवारी व परवा, बुधवार असे दोन दिवस यलो अलर्ट जारी केला आहे. दोन दिवस सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्याच्या बहुतांश भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. आज दुपारनंतर पाऊस थांबल्याने अनेक भागातील पूर ओसरू लागला होता.

शनिवारी रात्री जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले होते. त्याच वेळी गावोगावचे नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहत होते. त्यानंतर दिवसभर थांबलेला पाऊस रविवारी रात्री पुन्हा सुरू झाला. तो आज दुपारपर्यंत सुरू होता. पावसाने सर्वाधिक नुकसान पाथर्डी तालुक्यात झाले. करंजी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाला. घाटातून खाली येणारे पाणी करंजी गावात घुसले. मढी, जवखेडे खालसा व जवखेडे दुमाला, भालगाव, कारेगाव या गावांचा संपर्क पुराच्या पाण्यामुळे तुटला होता. कासार पिंपळगाव येथे १५ गाई व ५ वासरे, तसेच शिरसाटवाडी येथे १३ शेळ्या व ५ वासरे वाहून गेली.

नगरहून शेवगावकडे मिरीमार्गे व तिसगावमार्गे रस्त्यावरील वाहतूक बंद पडली होती. शेवगावमधील भगूरगावचा संपर्क तुटला होता. नगरहून जामखेडकडे जाणारी वाहतूकही चिचोंडी पाटील येथील पुराच्या पाण्याने बंद पडली होती. नगर-कल्याण रस्त्यावरील वाहतूकही बंद झाली होती.

शेवगाव तालुक्यातील वडुली येथील १२ जणांची व कर्जत तालुक्यातील करपडी येथील ८ जणांची पुराच्या पाण्यातून बचाव पथकांनी मुक्तता केल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाली.

अतिवृष्टी झालेली मंडले

पारनेर तालुक्यातील निघोज व पळवे, श्रीगोंद्यातील श्रीगोंदे, बेलवंडी, पेडगाव, चिंभळा, देवदैठण, कोळगाव, आढळगाव, कर्जत तालुक्यातील राशिन, भांबोरा, कोंभळी, मिरजगाव, खेड, पाथर्डी तालुक्यातील तिसगाव, माणिकदौंडी या मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे.

शाळांना सुटी

हवामान विभागाने दिलेला सतर्कतेचा इशारा लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन शाळांना सुटी देण्याचे अधिकार स्थानिक शाळा व्यवस्थापन समित्यांना बहाल केले आहेत. जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे. माध्यमिक शाळांनी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, असे माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी सांगितले.

दरम्यान, नगर शहरातील काही शाळा भरल्यानंतर आज सकाळी सोडून देण्यात आल्या.

पालकमंत्र्यांच्या सूचना

अतिवृष्टीने निर्माण झालेल्या नैसर्गिक संकटात नागरिकांना मदत उपलब्ध करा, पाणी आलेल्या नागरी वस्त्यांमधील लोकांच्या सहकार्यासाठी सर्व विभागांनी समन्वयांनी यंत्रणा कार्यान्वित कराव्यात, अशी सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. मंत्री विखे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून परिस्थितीची माहिती घेतली व अतिवृष्टीने नागरिकांचे हाल होणार नाहीत त्याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. पुराचा धोका असलेल्या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देश दिले आहेत. पूर ओसरल्यावर नुकसानीची अंतिम आकडेवारी समोर येईल. सध्या नागरिकांना मदत उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले आहे, असे विखे पाटील यांनी सांगितले.

नगर शहरातील रस्त्यांची दुरवस्था

जोरदार पावसाने नगर शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली. गणेशोत्सव व तत्पूर्वी मोहरम काळात रस्त्यांची डागडुजी करण्यात आली होती. त्याचे पितळ पावसाने उघडे पडले. नालेसफाई व्यवस्थित न झाल्याने शहराच्या अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते. सकाळपासूनच अंधारून आल्याने चालकांना दिवे लावून वाहन चालवावे लागत होते. पावसाने हवेत चांगलाच गारठा निर्माण केला.