Shivsena MLA Prakash Surve apologize controversial statement over marathi language : शिवसेनेचे (शिंदे) आमदार प्रकाश सुर्वे यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना “मराठी माझी आई आहे, तर उत्तर भारत माझी मावशी आहे. आई मेली तरी चालेल, मात्र मावशी मरायला नाही पाहिजे”, असं वक्तव्य केलं आहे. सुर्वेंच्या या वक्तव्यामुळे राज्यातील जनतेने त्यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. तसेच विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. त्यानंतर सुर्वे यांनी त्यांच्या वक्तव्याप्रकरणी माफी मागितली आहे. “मराठी आमची मायमाऊली आहे. काल अनावधानाने माझ्या तोंडून ते शब्द गेले.”
दरम्यान, यावरून मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी प्रकाश सुर्वेंवर संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. एका आमदाराने असं वक्तव्य करणं ही त्यांची लाचारी आहे. ही गंभीर चूक आहे. अशा चुका यापुढे करू नका एवढंच मी त्यांना सांगेन.”
प्रकाश सुर्वे नेमकं काय म्हणाले होते?
प्रकाश सुर्वे म्हणाले होते की “मी हे सांगू इच्छितो की मराठी माझी आई आहे, तर उत्तर भारत माझी मावशी आहे. एकवेळ आई मेली तरी चालेल. पण मावशी मरायला नको. कारण मावशीचं आपल्यावर जास्त प्रेम असतं. मला माझ्या आईपेक्षा जास्त प्रेम तुम्ही (उत्तर भारतीयांनी) दिलं आहे. माझ्यासाठी आणि माझ्या सहकाऱ्यांसाठी तुमचं प्रेम असंच ठेवा.”
अंबादास दानवेंची टीका
यावरून शिवसेनेचे (ठाकरे) नेते अंबादास दानवे म्हणाले, प्रकाश सुर्वे यांना आईचं महत्त्व माहिती नसेल. मागे एका ब्रिजवर त्यांनी केलेला प्रकार सर्वांनी पाहिला होता. त्यांचं ते कर्तृत्व सगळ्यांनीच पाहिलं आहे. ही माणसं आपल्या आईचा सन्मान काय राखणार? असे पुत्र असतील तर त्यांचं व त्यांच्या पक्षाचं चांगलं कल्याण होईल.
प्रकाश सुर्वेंच्या वक्तव्यामुळे काँग्रेसचा फडणवीसांना टोला
दरम्यान, यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “प्रकाश सुर्वेंचं वक्तव्य हे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचं धोरण आहे. अलीकडच्या काळात फडणवीस यांना पंतप्रधान होण्याची स्वप्नं पडत आहेत. ते दिवसाही अशी स्वप्नं पाहात आहेत. हिंदी भाषिकांमध्ये लोकप्रिय होण्यासाठी ते मराठीच्या छातीत खंजीर खुपसतायत. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेने या घटनेकडे बारकाईने लक्ष देऊन मराठीच्या संवर्धनासाठी काम करावं.”
