हिंगोली : वसमत तालुक्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन मोजणीचे काम तालुका प्रशासनाने हाती घेतले. जोडजवळा येथे शेतकऱ्यांनी मोजणीस विरोध करताना एकत्र येत धरणे आंदोलन केले.
रूज, गुंज, आसेगावनंतर गुरुवारी जोडजवळ येथे ‘शक्तिपीठ’ला विरोध करण्यात आला. तालुक्यात ७ जुलैपासून शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन मोजणीच्या प्रक्रियेस प्रशासनाने सुरुवात केली आहे. वसमत तालुक्यातील १४ गावातील २०० हेक्टर आर जमीन २० कि.मी. च्या शक्तिपीठ महामार्गात जाणार आहे. पिंपळा चौरे येथील ६६ हेक्टर जमिनीची मोजणी झाली.
येथे शक्तिपीठ महामार्गास प्रथमच विरोध झाला नाही. परंतु त्यानंतर रुंज, गुंज, लोन आसेगाव येथील शेतकऱ्यांनी महामार्गासाठी जमीन देण्यास तीव्र विरोध सुरू केला. गुरुवारी जोडजवळा येथे शक्तिपीठ महामार्गाकरिता उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या नेतृत्वाखाली जमीन मोजणीस अधिकारी व कर्मचारी गेले होते. परंतु, जोडजवळा येथील शेतकऱ्यांनी मार्गावर धरणे आंदोलन केले व जमीन देण्यास तीव्र विरोध व्यक्त केला.
महसूल प्रशासनास मागण्यांचे निवेदन दिले. मोजणी करण्यास आलेले पथक मोजणीविनाच परतले. प्रशासनाला दिलेल्या निवेदनावर राजू वाघमारे, गोविंद डाढाळे, ईश्वर सवंडकर, शिवाजी पवार, तुकाराम पवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, हट्टा ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.