पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील पुराचे पाणी ओसरू लागले आहे. अनेक तालुक्यांत पावसाने विश्रांती घेतली आणि ऊन पडल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र या पुरात अनेकांचे संसार वाहून गेले. घरात चिखल, शिल्लक राहिलेले सामान, पाण्यात कुजलेल्या वस्तू अशा विदारक परिस्थितीत नागरिकांचे पुन्हा संसार उभा करण्याचे काम सुरू झाले आहे. अनेक संस्था मदतीसाठी पुढे आल्या आहेत. मात्र पै पै जमा करून उभा केलेला संसार पुरामुळे उद्ध्वस्त झाला. तर काबाडकष्ट करून काळ्या मातीची अवस्था बघून शेतकऱ्यांचे हृद्य पिळवटून टाकणारे होते.

सोलापूर जिल्ह्यात करमाळा, माढा, मोहोळ या तालुक्याला सीना नदीचे पाणी आणि अतिवृष्टीमुळे पुराचे संकट ओढवले. रात्रीतून पाणी वाढल्याने अनेक नागरिकांनी घरातील जेवढे जमेल तेवढे साहित्य सुरक्षित ठेवून सरकारने सांगितलेल्या ठिकाणी जीव मुठीत घेऊन गेले. काही जण पाणी ओसरेल म्हणून छतावर वाट पाहत आशेवर थांबले. मात्र पाणी वाढल्याने अशा काही कुटुंबांना बोट, हेलिकॉप्टरने सुरक्षित ठिकाणी हलवले. घरदार सोडताना डोळ्यांत अश्रू आणि पुढे काय पाहावे लागणार याची चिंता होती. मात्र पाणी ओसरू लागल्यावर या नागरिकांची पावले घराकडे वळली.

घरातील साहित्य अस्ताव्यस्त, कुजलेले वास, सर्वत्र चिखल, अन्नधान्याचे डबे रिकामे, टीव्ही, फ्रीज, फर्निचर पाण्यात असे भयानक चित्र पाहून पायातील अवसान गेले. डोळ्यांतील आसवे पुसत शिल्लक राहिलेले सामान गोळा करणे, चिखल काढणे आणि पुन्हा संसार उभा करण्याची धडपड सुरू झाली. असेच विदारक चित्र शेताकडे पाहून शेतकऱ्यांचे झाले. निसर्गापुढे काही चालत नाही, असे कपाळावर हात मारण्याशिवाय पर्याय उरला नाही.

या पुरामुळे महामार्ग, रेल्वेसेवा पुन्हा पूर्वपदावर आली. महामार्गावर वाहतूक संथ गतीने सुरू केली. त्यामुळे हळूहळू वाहतूक सुरळीत होईल. तसेच रेल्वे सेवा सुरू झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. आता या पूरग्रस्तांना मदतीसाठी विविध संस्था पुढे आल्या आहेत. मंत्री, विरोधी पक्षाचे नेते दौरे करून बाधितांना दिलास देत आहेत. तर विरोधक अधिकची मदत द्या, अशी मागणी करत आहेत. पुराचे पाणी हळूहळू ओसरत आहे. मात्र पुढील दोन दिवस हवामान खात्याने अलर्ट दिला आहे. त्यामुळे पुन्हा पुराचे संकट ओढावणार का? अशी चिंता प्रशासनासह नागरिकांना आहे. असे असले तरी बाधितांना पुन्हा उभे करण्यासाठी सरकार मदत करेल, मात्र या पुरामुळे बाधित बळीराजा पुरता कोलमडला, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.