दिल्लीच्या सहकार्याने देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना संपवण्याचे राजकारण केले मात्र आता त्यांना शिवसेना काय आहे हे समजू लागल्याने अशाप्रकारची विधाने ते करत असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना लगावला. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिल्यानंतर नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“पाच वर्षाचा निकाल पाहिला तर भाजपामुळे शिवसेनेचे खच्चीकरण झाले आहे. उध्दव ठाकरे यांनी २५ वर्ष युतीत सडलो असे विधान केले आहे. मात्र आता शिवसेनेची ताकद वाढताना दिसत आहे. आता जे नगरपालिकांचे निकाल आले त्यावरुन भाजपासोबत राहिल्याने कमकुवत झालेल्या शिवसेनेचा ग्राफ कितीतरी पटीने वाढलेला दिसला,” असे नवाब मलिक म्हणाले.
“बाळासाहेबांनी युतीचा निर्णय घेतला होता शिवाय जिवंत असताना युतीतून बाहेर पडण्याचा विचारही केला होता. आम्ही काँग्रेससोबत असताना सेनेकडून राष्ट्रवादी सोबत आली पाहिजे हा प्रस्ताव होता पण काही कारणामुळे जमले नाही. २०१९ च्या आधीपासून भाजपासोबत खच्चीकरण होतेय ही चर्चा सुरू होती. भाजपा ज्या पक्षांसोबत युती करतो त्यांचे खच्चीकरण करतो हे सेनेला अगोदरच कळले होते. त्यामुळे सेनेने भूमिका घेऊन भाजपाला बाजूला केले,” असेही नवाब मलिक म्हणाले.
सेनेसोबत असताना भाजपा मोठी झाली हे आता देवेंद्र फडणवीस यांना समजले आहे. पण आठ वर्षापासून देवेंद्र फडणवीस सेनेला संपवण्याचे राजकारण करत होते, असा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला.
दरम्यान,“सोयीचा इतिहास आणि निवडक विसरणं या दोन गोष्टी प्रामुख्याने उद्धव ठाकरेंच्या भाषणात पहायला मिळाल्या. २५ वर्ष आम्ही युतीत सडलो असं ते म्हणाले. पण २०१२ पर्यंत या युतीचे नेते हे स्वत: वंदनीय बाळासाहेब ठाकरे होते. या युतीचा निर्णय त्यांनी केला होता. त्यांच्या हयातीत त्यांनी ही युती कायम ठेवली. याचा अर्थ बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही बोट दाखवत आहात का? भाजपासोबत शिवसेना सडत असताना बाळासाहेबांनी सडत ठेवलं का? असा विचार आमच्या मनात येत आहे,” असे फडणवीस यांनी याआधी म्हटले होते.