सांगली : कोणाला तरी पुढे करून महापुरूषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा उद्योग राज्यात आणि देशात सुरू आहे. बेरोजगारीचा प्रश्न मोठा असूनही त्याकडे पाहण्यास सरकारला वेळ नाही, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी गुरूवारी सांगलीत म्हटले आहे.
गुरूवारी सांगलीमध्ये विष्णुअण्णा खरेदी विक्री संघाच्या नूतनीकरणाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, सतेज पाटील, विशाल पाटील, जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील आदी उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, राज्यात पुन्हा मते मिळत नाहीत, याची जाणीव झाल्यानेच पक्ष फोडाफोडीचे राजकारण भाजपकडून सुरू आहे. शिंदे-फडणवीस सरकारकडे बहुमत असताना पक्ष फोडाफोडीची गरज नसताना लोकमत विरोधात असल्यामुळेच हा उद्योग सुरू आहे.
हेही वाचा : नाशिकमध्ये आज उद्योगांबाबत मंथन
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत यश मिळणार नसल्यानेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टाळल्या जात आहेत. लोक प्रतिनिधींपेक्षा सरकारी अधिकारी वर्गावर या सरकारची जास्त भिस्त असून लोकशाहीपेक्षा नोकरशाहीच भाजपला सोयीची वाटत आहे, असे चव्हाण यांनी म्हटले आहे. त्यानंतर मराठा आरक्षणाबाबत अशोक चव्हाण म्हणाले, मनापासून आरक्षण द्यायचे असेल तर केंद्र सरकारने आरक्षणाची पन्नास टक्क्यांची अट काढली पाहिजे. आरक्षणासाठी तरूणांनी राज्यात नव्हे तर दिल्लीत आंदोलन करण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.