कराड : कराड तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने विवाह केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आल्याने खळबळ उडाली. पीडित मुलीनेच याबाबतची तक्रार कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली असून, विवाह न केल्यास आई- वडिलांनी ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मुलीच्या फिर्यादीनुसार, तिचे आई, वडील, पती, सासू, सासरे यांच्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की ती कुटुंबासह कराड तालुक्यातील एका गावात राहते. १२ जून रोजी तिला तिच्या आई-वडिलांनी तुला पाहुणे बघायला येणार असून, आपण आत्ता फक्त साखरपुडा करायचा आहे, अशी बतावणी केली. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील एका गावातील एक कुटुंब मुलीला पाहण्यासाठी आले. साखरपुडा करायचा म्हणून थेट लग्नाची तयारी सुरू झाली. ही बाब मुलीच्या लक्षात आल्यावर तिने माझे लग्नाचे वय नाही, म्हणत स्पष्ट नकार दिला असता, तिच्या आई-वडिलांनी तिला जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
मुलीच्या परवानगीशिवाय तिचे लग्न करून तिला सासरी पाठवले. या मुलीने तेथून पळ काढत ती कराड तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली. तिने दिलेल्या फिर्यादीवरून तिच्या आई, वडिलांसह पती, सासू, सासरे, भटजी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.