सावंतवाडी : “जागतिक बाजारपेठ आपल्या उत्पादनांसाठी उपलब्ध होणार नाही, हे लक्षात घेऊन प्रत्येकाने भारतातच व्यवसाय कसा करता येईल याचा मध्यबिंदू शोधायला हवा,” असे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटले आहे. कोकणातील उत्पादनांना आपल्या देशात बाजारपेठ मिळवून दिली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.प्रभू म्हणाले, “अमेरिकेने सुरू केलेला व्यापार युद्ध लक्षात घेता, भारताने स्वतःची बाजारपेठ विकसित करायला पाहिजे.
जागतिक बाजारपेठेमध्ये प्रत्येक देश स्वतःचे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, परंतु यापुढे जागतिक बाजारपेठांत आपल्याला स्थान मिळणार नाही, हे लक्षात घेऊन पुढच्या काळात भारताने स्वतःची बाजारपेठ कशी निर्माण करता येईल आणि स्वतःच्या उत्पादनांना कसा न्याय देता येईल, हे पाहिले पाहिजे. यापूर्वी नारळ आणि काजूचे भाव गडगडले होते, हे लक्षात घेता आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्रामध्ये आपल्याला चांगला भाव मिळणार नाही, हे लक्षात घ्यायला हवे. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे आपल्या उत्पादनाची विक्री घसरणीवर जाणार नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे.”
राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर या प्रश्नावर मी काही बोलणार नाही. सगळ्यांना चांगले दिवस यावेत, एवढ्याच मी शुभेच्छा देतो, असे सांगून प्रभू म्हणाले, “दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी भारताने पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना लक्ष्य केले. तो पाकिस्तानवर हल्ला नव्हता, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. भारतीय सैनिकांनी दहशतवाद्यांना कंठस्नान घालून योग्य उत्तर दिले आहे.” धर्म-जातीपलीकडे एकसंघ समाज निर्माण करण्यासाठी खऱ्या अर्थाने सैन्य ॲक्शन घेत आहे. जातीनिहाय जनगणना हा राजकीय प्रश्न असला तरी सर्वांनी एकसंघ राहिले पाहिजे, असे देखील प्रभू यांनी स्पष्ट केले.
सावंतवाडी अर्बन बँक विलीनीकरण कार्यक्रमासाठी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आले असताना पत्रकारांशी संवाद साधला.ते म्हणाले, कोकणचा विकास होण्यासाठी सर्वांनी राजकीय पादत्राणे बाजूला ठेवून काम केले पाहिजे.