Prajakta Mali Program at Trimbakeshwar Temple : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या वतीने जय्यत तयारी करण्यात येत असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि तिचे सहकलाकार येथे शिवार्पणनस्तु नृत्य सादर करणार आहेत. मात्र, या कार्यक्रमाला आता माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी विरोध दर्शवला आहे. यासंदर्भात त्यांनी देवस्थानला पत्र लिहिले असून चुकीचा पायंडा न पाडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यांनी माध्यमांशी संवाद साधूनही त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाशिवरात्र उत्सव २०२५ च्या अनुषंगाने मागील वर्षी सुरू करण्यात आलेल्या सोहळ्यानुसार यावर्षी देखील २५ फेब्रुवारी रोजी हळदीचा समारंभ होणार आहे. त्याअनुषंगाने मंदिराला फुलांची आकर्षक आरास करण्यात येईल. मंगळवारी सायंकाळी सातपासून रात्री नऊपर्यंत बासरी प्रशिक्षण वर्गाचा बासरी वादन कार्यक्रम होईल. परंपरेनुसार बुधवारी दुपारी तीन वाजता श्रीत्र्यंबक राजाची पालखी मंदिरातून निघेल. सकाळी देवस्थानमध्ये लघुरुद्र तसेच अन्य धार्मिक कार्यक्रम होतील. नियोजित मार्गावरून पालखी पुन्हा देवस्थानमध्ये येईल. या दरम्यान शिव तांडव ग्रुपतर्फे नृत्याचे सादरीकरण मंदिरासमोर तसेच मुख्य दोन चौकांमध्ये करण्यात येणार आहे. सायंकाळी आठ वाजता नटरंग अकादमीच्या वतीने शिवार्पणमस्तु नृत्य कार्यक्रमाची प्रस्तुती अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि सहकलाकार सादर करणार आहेत. 

माजी विश्वस्त काय म्हणाल्या?

या कार्यक्रमासंदर्भात मंदिराच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे म्हणाल्या, “महाशिवरात्रीचा अतिशय पवित्र दिवस आहे. येथे धार्मिकच कार्यक्रम झाले पाहिजेत. प्राजक्ता माळी शिवस्तुती सादर करणार असतील, तरी त्याचा पुनर्विचार झाला पाहिजे. कारण मी स्वतः या मंदिराची माजी विश्वस्त आहे. शास्त्रीय नृत्य, कथ्थक नृत्य ठेवलं पाहिजे. पण सेलिब्रिटिंना आणून येथे एक वेगळाच पायंडा त्र्यंबकेश्वर देवस्थानने सुरू केलाय. हे चुकीचं घडतंय.”

दरम्यान, फुलवंती हा तिचा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्राजक्ता माळीने बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले होते. या चित्रपटाच्या यशस्वीतेनंतर तिने बारा ज्योतिर्लिंगाचे आशीर्वाद घेऊन तिच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात केली होती. त्र्यंबकेश्वर येथील तिच्या कार्यक्रमाला विरोध झाल्यानंतर तिची भूमिका काय याविषयी अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former trustee of trimbakeshwar temple of nashik opposed prajakta mali dance performe on the occassion of mahashivratri 2025 sgk