नांदेड : सत्ताधारी वगळता अनेक राजकीय पक्षांनी ईव्हीएमबाबत संशय व्यक्त केला आहे. परंतु ओरड करण्यापलीकडे ते काहीही करू शकत नाहीत. त्यामुळे ‘ईव्हीएम’ विरोधात जनतेतून चळवळ उभी करावी लागेल, असे मत महात्मा गांधी यांचे पणतू ॲड. तुषार गांधी यांनी येथे व्यक्त केले.

‘हम भारत के लोग’ या राज्यघटनेच्या प्रारंभाच्या वाक्याचा उपयोग करून ॲड. गांधी यांच्या नेतृत्वाखाली राजकारण वर्ज्य नसलेला एक मंच स्थापन करण्यात आला आहे. यामागची भूमिका विषद करण्यासाठी ते रविवारी नांदेडमध्ये आले होते. सकाळी ११ वाजता त्यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात विविध चळवळीतील कार्यकर्त्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी गांधी यांनी थोडक्यात मत व्यक्त केले. या बैठकीस विजय गाभणे, श्याम निलंगेकर, प्रा. बालाजी कोंपलवार, कॉ. प्रदीप नागापूरकर, डॉ. रेखा चव्हाण प्रभृती उपस्थित होते.

यावेळी गांधी म्हणाले, की विद्यमान सरकार स्वतः काही विषय समाजावर थोपत असून लोक मग त्यावर तुटून पडत आहेत. या धामधुमीत लोकांचे खरे प्रश्न बाजूला राहत आहेत. सर्वसामान्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे. हे परिवर्तन भारताचे सामान्य लोकच करू शकतात. त्यासाठीच ‘हम भारत के लोग’ हा मंच स्थापन करण्यात आल्याचे सांगतानाच राजकारण वर्ज्य ेनसल्याचेही त्यांनी नमूद केले.