सांगली: शक्तीपीठबाबत मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही, मुख्यमंत्रीच निर्णय घेऊ शकतात असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगताच आंदोलकांनी मंत्री पाटील यांच्याविरुध्द हाय हायच्या घोषणा देत शासनाच्या विरोधात निदर्शने केली.

महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण झाल्यानंतर शासकीय बैठकीसाठी मंत्री जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. बैठक संपवून मोटारीचा ताफा बाहेर पडत असताना आंदोलकांनी अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाटील स्वत: आंदोलकांना सामोरे गेले. आंदोलकांनी समांतर महामार्ग असताना शक्तीपीठची गरजच काय असा सवाल करत शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची आग्रही मागणी केली. यावर पाटील यांनी याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेऊ शकतात असे सांगितले.

नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि काही शेतकऱ्यांनी सांगलीचे पालकमंत्री पाटील यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात भेटी दरम्यान पोलिसांनी बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना तसेच शेतकऱ्यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करत असताना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. हे पाहून पाटील यांनी पोलिसांनी तंबी देत यातील कोणत्याही पदाधिकाऱ्याला, शेतकरी आंदोलकांना हात लावू नये, मी या त्यांच्याशी चर्चा करायला समर्थ आहे असे म्हणत, मी पण चळवळीतून पुढे आलोय, हे काल आलेत असं म्हणत पोलिसांना या आंदोलकांना हात लावू नका अशा सूचना दिल्या.

मात्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या चर्चेतून या आंदोलनकाना काही ठोस आश्वासन न मिळाल्याने या आंदोलकांनी चंद्रकांत पाटील यांचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटमधून ताफा बाहेर पडत असताना जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारा जवळचे वातावरणपण तणावपूर्ण बनले होते.