महाविकास आघाडीचे दोन शिल्पकार होते एक होते शरद पवार तर दुसरे होते संजय राऊत. या दोघांपैकी आता संजय राऊत हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर आले आहेत. कारण २०२२ मध्ये शिवसेनेत जे सर्वात मोठं बंड झालं त्यानंतर सातत्याने संजय राऊत हे सातत्याने एकनाथ शिंदेंवर आणि फुटून गेलेल्या आमदारांवर टीका करत होते. मात्र आता शिवसेनेच्या मंत्र्याने संजय राऊत यांनीच शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव दिला होता असं या मंत्र्याने म्हटलं आहे.
२०२२ मध्ये काय घडलं?
जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना बरोबर घेत भाजपासह जाणं पसंत केलं. शिवसेनेतलं हे सर्वात मोठं बंड ठरलं. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली आणि पदासाठी काँग्रेससह युती केली असं सांगत एकनाथ शिंदे यांनी हे बंड पुकारलं आणि थेट शिवसेनेवरच दावा सांगितला. निवडणूक आयोगानेही एकनाथ शिंदेंना शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह असलेला धनुष्यबाण दिला. दरम्यान संजय राऊत हे सातत्याने एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या सगळ्या आमदारांवर टीका करत राहिले. सुरुवातीला एकनाथ शिंदेसह सगळ्या आमदारांना बरोबर घ्यायचा प्रयत्न झाला. पण त्यात यश आलं नाही. एकनाथ शिंदे त्यांच्यासह असलेले ४० आमदार आणि भाजपा एकत्र आले. ज्यानंतर एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. उद्धव ठाकरेंसाठी हा सर्वात मोठा धक्का ठरला होता. आता शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव हा संजय राऊत यांनीच एकनाथ शिंदेंना दिला होता असा दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये माध्यमांशी बोलताना केला आहे.
काय म्हणाले गुलाबराव पाटील?
“शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव हा संजय राऊत यांनीच एकनाथ शिंदेंच्या पुढे मांडला होता. त्यावेळी तो एकनाथ शिंदे यांनी नाकारला होता. सर्वात आधी संजय राऊतच फुटणार होते पण ते थांबले.” असं गुलाबराव पाटील म्हणाले. काही दिवसांपूर्वी शहाजीबापू पाटील यांनीही असाच दावा केला होता.
शहाजीबापू पाटील काय म्हणाले होते?
शिवसेना फुटली त्यावेळेस सर्वात आधी संजय राऊत फुटणार होते, मात्र साधारण ३६ आमदारांनी त्यांना विरोध केला, असं शहाजी बापू पाटील म्हणाले. आता, मंत्री गुलाबराव पाटील यांना देखील शहाजी बापूंची री ओढली आहे. तसंच एकनाथ शिंदेंना हा प्रस्ताव संजय राऊत यांनीच दिला होता असंही त्यांनी म्हटलं आहे.
२०१९ पासून संजय राऊत चर्चेत आहेत
२०१९ पासून संजय राऊत हे प्रचंड चर्चेत आले आहेत. शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार हे त्यांनी सातत्याने सांगितलं होतं. ज्यानंतर महाविकास आघाडी तयार झाली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यातही राऊत यांचा मोठा वाटा होता. त्यानंतर जेव्हा उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं तेव्हाही संजय राऊत हे सातत्याने उद्धव ठाकरेंची आणि त्यांच्या शिवसेनेची बाजू लावून धरत राहिले आहेत. मात्र शिवसेनेच्या दोन नेत्यांनी संजय राऊतच फुटणार होते असा दावा केला आहे.