Harshvardhan Sapkal काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर टीका केली होती. देवेंद्र फडणवीस यांचा कारभार औरंगजेबाप्रमाणेच आहे असंही सपकाळ म्हणाले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी तसंच विधान केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ?

महाराष्ट्रातली सध्याच्या घडीची सगळ्यात मोठी समस्या कुठली असेल तर ती म्हणजे माणसा-माणसांत, समाजात, माणसांच्या मनामनांत, जाती-धर्मात जो द्वेष पसरतो आहे. या गोष्टी घडत असल्याने सद्भवना हा विचारच लयाला गेला आहे. दुसरीकडे माणसं कुठल्याही दुकानात गेली असताना किंवा कुठला व्यवहार करत असताना जातीच्या व्यक्ती आहेत का? हे पाहू लागली आहेत. एवढंच नाही तर कुठल्या कार्यक्रमाला पाहुणा म्हणून बोलवलं जात असताना आपल्याच जातीचा व्यक्ती असावा यासाठी आग्रही आहेत असं दिसून येतं आहे. तात्पर्य म्हणून सांगायचं झालं तर शिव, फुले शाहू आंबेडकरांचा वारकऱ्यांचा संत गाडगेबाबांच्या विचारांचा आणि महाराष्ट्र धर्म जो आपण मानतो त्याची घडी कुठेतरी विस्कळीत झाल्याचं दिसून येतं आहे असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे.

सद्भावना जपणं आवश्यक आहे-सपकाळ

समाजाची ही अशी घडी विस्कटलेली असताना कुठल्या मुद्द्यावर काम केलं पाहिजे तर त्याचं उत्तर हे सद्भावना हे आहे. असंही सपकाळ म्हणाले, सपकाळ यांनी राज्याच्या एकंदरीत परिस्थितीवर भाष्य केलं आहे. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात मुलाखत देत असताना हर्षवर्धन सपकाळ यांनी विविध मुद्द्यांवर त्यांनी त्यांचं मतप्रदर्शन केलं आहे.

मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली कारण…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कारभार औरंगजेबासारखाच आहे असं मी म्हटलं याचं कारण ते करत असलेला कारभारच आहे असं सपकाळ म्हणाले, तसंच ते पुढे म्हणाले, आगामी काळात सद्भावना बाळगूनच समाजासाठी काम करण्याची माझी पक्षीय आणि व्यक्तिगत इच्छा आहे. औरंगजेबाचा दाखला देत मी मुख्यमंत्र्यांवर टीका केलेली नसून ते वक्तव्य कारभाराच्या अनुषंगाने होतं. ज्या घटना सध्या राज्यात घडत आहेत त्यामागचं वास्तव अत्यंत क्रूरपणे एकापाठोपाठ एक उजेडात येत आहे. हा घटनाक्रम लक्षात घेता मी ते वक्तव्य केलं असं स्पष्टीकरण सपकाळ यांनी दिलं आहे.

तरुण शेतकरी आत्महत्या करतो हे दुर्दैवी आहे-सपकाळ

राज्यपालांनी पुरस्कार दिलेल्या तरुण शेतकऱ्यावर आठ पाणी पत्र लिहून आत्महत्येची वेळ आली, बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी मी जाऊन आलो आहे. संतोष देशमुख यांची ज्या क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली त्याचे वर्णनही आपण करू शकत नाही. तिथे पोलीस ही नाही, हम करे सो कायदा असं म्हणत निवडक टोळीच्या हातात कायदा आहे. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरील बलात्काराची घटना असेल. जळगाव मध्ये एका केंद्रीय मंत्र्याला पोलीस स्टेशनमध्ये धरणे आंदोलन देऊन आरोपींना अटक करा अशी मागणी करावी लागते आहे. बुलढाणा जिल्ह्यातील कैलास नांगरे नावाचा शेतकरी तरुण आहे. शेतीतील अभिनव प्रयोग या विषयात त्याला स्वतः राज्यपालांनी पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. त्या शेतकऱ्याच्या अंत्यविधीला मी गेलो होतो. माझ्या मुलाला तू शिकव असं काही महिन्यापूर्वी मी त्याला म्हणालो होतो. त्याच तरुण शेतकऱ्याला आठ पानी पत्र लिहून आत्महत्या करावी लागते हे उघड उघड शासनाचे अपयश आहे. असंही मत सपकाळ यांनी व्यक्त केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harshvardhan sapkal said this thing about maharashtra government and aurangzeb also criticized devendra fadnavis scj