अनिल देशमुख माझ्याबरोबर सर्व बैठकांना उपस्थित होते. मात्र, मंत्रीपद न मिळाल्याने ते आमच्याबरोबर आले नाहीत, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी ( १ डिसेंबर ) केला होता. याला माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “भाजपाबरोबर जाण्यासाठी हसन मुश्रीफ माझ्या घरी पाच तास बसले होते. पण, मला त्रास देणाऱ्यांबरोबर मी कुठल्याही परिस्थितीत जाणार नव्हतो,” असं देशमुखांनी स्पष्ट केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजित पवार काय म्हणाले होते?

“अनिल देशमुख माझ्याबरोबर सर्व बैठकांना उपस्थित होते. ‘मला मंत्रीमंडळात स्थान मिळालं पाहिजे,’ असं देशमुखांनी म्हटलं होतं. पण, भाजपाकडून सांगण्यात आलं की, ‘आम्ही देशमुखांवर सभागृहात आरोप केले आहेत. लगेच मंत्रीमंडळात त्यांना स्थान दिलं, तर आमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होईल, त्यामुळे अनिल देशमुखांना घेता येणार नाही. मग, मंत्रीपदाच्या यादीतून देशमुखांचं नाव वगळलं गेलं. त्यावर देशमुखांनी सांगितलं, ‘मला मंत्रीपद नाही तर मी तुमच्याबरोबर येणार नाही.’ ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे,” असं अजित पवारांनी म्हटलं होतं.

हेही वाचा : अजित पवारांकडून जोरदार हल्लाबोल, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “काहींनी…”

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. तेव्हा अजित पवारांनी केलेल्या विधानावर देशमुखांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

हेही वाचा : “…तर अजिबात खपवून घेणार नाही”, रोहित पवारांचं अजित पवारांना जशास तसं प्रत्युत्तर

अनिल देशमुख म्हणाले, “भाजपानं मला खोट्या प्रकरणात फसवलं होतं. त्यामुळे त्यांच्याबरोबर जाण्याचा प्रश्नच नव्हता. मला पाहिजे, ते खातं देण्याची त्यांची तयारी होती. तसेच, भाजपाबरोबर जाण्यासाठी हसन मुश्रीफ माझ्या घरी पाच तास बसले होते. पण, मला त्रास देणाऱ्यांबरोबर मी कुठल्याही परिस्थितीत जाणार नव्हतो. तसेच, मी शरद पवारांची साथ सोडणार नव्हतो.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hasan mushrif 5 hours my home go with bjp say anil deshmukh ajit pawar allegation sharad pawar ssa