तरूण आणि बेरोजगारीचे प्रश्न घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पुणे ते नागपूर अशी ‘युवा संघर्ष यात्रा’ काढली आहे. ही यात्रा वाशिम जिल्ह्यात पोहचली आहे. अशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संघर्ष यात्रेवरून रोहित पवार यांना लक्ष्य केलं होतं. याला रोहित पवारांनीही जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे.

अजित पवार काय म्हणाले होते?

कर्जतमधील वैचारिक मंथन शिबिरात बोलताना अजित पवारांनी म्हटलं, “काहीजण गुडघ्याला बाशिंग बांधून फिरत आहेत. संघर्ष म्हणे… अरे कशाचा संघर्ष… कधी आयुष्यात संघर्ष केला नाही, आता कशाचा संघर्ष करत आहात.”

“आमचा हा संघर्ष लहान असला तरी…”

याला प्रत्युत्तर देताना रोहित पवार ‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर म्हणाले, “आदरणीय अजित दादा, युवांच्या मागण्यांसाठी आम्ही सर्व युवा पुणे ते नागपूर असा ८०० किमीचा पायी प्रवास करत असून नागरिकांशी संवाद साधत आम्ही आतापर्यंत ५०० किमीचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. आपल्या नजरेत आमचा हा संघर्ष लहान असला तरी ज्या मागण्यांसाठी आम्ही संघर्ष करत आहोत. त्या मागण्या अत्यंत महत्वाच्या असून लाखो युवांच्या भविष्याशी निगडित आहेत आणि याच मागण्यांसाठी भविष्यात मोठ्या संघर्षाची देखील आमची तयारी आहे.”

हेही वाचा : “मला अजित पवार अन् प्रफुल्ल पटेलांनी मंत्रीपदाची ऑफर दिली होती, पण…”, अनिल देशमुखांचं स्पष्टीकरण

“आपण माझ्यावर काहीही टीका करा”

“युवांच्या, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना घेऊन चाललेल्या युवा संघर्ष यात्रेकडे राजकीय टीकेसाठी का होईना आपले लक्ष गेलेच आहे. तर, युवकांचे जे मुद्दे आम्ही घेऊन चाललो आहोत त्यांच्याकडेही थोडे लक्ष द्या. आपण माझ्यावर काहीही टीका करा, टीका मी पचवून घेईल. परंतु, युवांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर अजिबात खपवून घेणार नाही,” असा इशारा रोहित पवारांनी अजित पवारांना दिला आहे.

हेही वाचा : “सोळंकेंना ‘प्रदेशाध्यक्ष’पदाचा दिलेला शब्द पाळला नाही,” अजित पवारांची टीका; जयंत पाटील प्रत्युत्तर देत म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आपली खरी ताकद पुन्हा एकदा दाखवून द्या”

“तुमची कार्यक्षमता आणि तळमळ महाराष्ट्राने याआधीही पाहिली आहे. भाजपबरोबर गेलात म्हणून ती कार्यक्षमता आणि तळमळ कमी झाली असल्याच्या चर्चा आहेत. तरी युवांचे प्रश्न मार्गी लावून आपली खरी ताकद पुन्हा एकदा दाखवून द्या,” असं आव्हानही रोहित पवारांनी अजित पवारांना दिलं आहे.