Kagal Gagar Parishad Murgud Municipal Council Election : कागल, मुरगुड नगरपालिका निवडणुकीसाठी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू उद्योग समूहाचे प्रमुख समरजित घाटगे यांनी हात मिळवणी केली आहे. या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष एकत्र आले आहेत. कागल नगरपालिकेची सत्ता मिळवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून मुश्रीफ-घाटगे एकत्र आल्याचा दावा देखील केला जात आहे. यावर स्वतः समरजीत घाटगे व हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिलं आहे.
समरजीत घाटगे म्हणाले, विरोधकांना आरोप करायला काहीतरी निमित्तच हवं आहे. मुळात या सगळ्यात भाजपा कुठेच नाही. व्ही. बी. पाटलांची (शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष) वक्तव्ये आमची वक्तव्ये म्हणून दाखवू नका. मी योग्य वेळी माझे पत्ते उघडेन. पिक्चर अभी बुहत बाकी हैं.”
एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी : हसन मुश्रीफ
दरम्यान, “आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी” अशी टिप्पणी हसन मुश्रीफ यांनी केली आहे. यावर त्यांना विचारण्यात आलं की ही युती कुठपर्यंत टिकेल? त्यावर मुश्रीफ म्हणाले, “युती होते तेव्हा त्या युतीचं भविष्य आमच्या हातात नसतं. जोवर कार्यकर्ते व नेते एकत्र आहेत तोवर युती टिकून राहते. एका घटनेने युती होत नाही, किंवा दोन नेते एकत्र येत नाहीत. असं केल्यास लोक आम्हाला जाब विचारतील. युतीची बैठक झाली. आम्ही कसे निवडून येऊ यावर चर्चा झाली. महायुतीत भाजप आमचा मोठा भाऊ आहे. आम्ही त्यांना समाजवलं, शिवसेनेच्या शिंदे गटालाही समजावलं. त्यानंतर या निर्णयावर आलो आहेत.”
ही दोन राष्ट्रवादींची युती नव्हे : समरजीत घाटगे
मुश्रीफ व घाटगे एकत्र येण्याआधी शिवसेनेचे (शिंदे) संजय मंडलिक व समरजीत घाटगे एकत्र येणार असल्याची चर्चा रंगत होती. त्याचदरम्यान, मुश्रीफ व घाटगे या कट्टर विरोधकांची युती झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. समरजीत घाटगे यांनी छत्रपती शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून हसन मुश्रीफ यांच्याशी युती केली आहे. त्यामुळे तांत्रिकृष्ट्या, ही दोन राष्ट्रवादींची युती नाही. तसेच ही युती करण्यापूर्वी शरद पवारांची परवानगी घेतल्याचं समरजीत घाटगे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.
