दापोली, राजापूर : रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी  मुसळधार पावसाने हजेरी लावली.  विजांचा कडकडाट, जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाळी वातावरणामुळे हर्णे बंदरातील मच्छीमारांची एकच धावपळ उडाली. सर्वच नौकांनी आंजर्ले खाडीत पलायन करीत असल्याचे चित्र दिसत होते. तसेच रत्नागिरी व  राजापुर तालुक्यात दुपारी सुरु झालेल्या पावसाने सगळ्यांचीच धावपळ उडविली.

 गेले ५ ते ६ दिवसा पासूनच २३ ते २८ मे या कालावधीत चक्रीवादळ येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. असा मेसेज बघून मच्छिमार घाबरले होते. परंतु अधिकृत रित्या असा मेसेज अजूनही हवामान खात्याकडून आलेलाच नाही. मंगळवार २० मे रोजी साधारण ३.३० च्या दरम्यान अचानक जोरदार वादळी वा-यासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे  सर्व सामान्य जनतेसह मच्छिमार बांधवांची एकच धावपळ उडाली. बंदरातील उभ्या केल्या जाणाऱ्या नौकांनी लागोलाग किनाऱ्यावर घ्यायला सुरुवात केली. छोट्या नौका सुद्धा ट्रॅक्टरच्या साहाय्याने किनाऱ्यावर घ्यायला सुरुवात केली.

दक्षिणेकडून येणाऱ्या जोरदार वाऱ्याने मच्छीमारांनी नौका ताबडतोब आंजर्ले खाडीत काळकाईच्या ठिकाणी नेऊन उभ्या केल्या. येणाऱ्या वादळापासून सुरक्षित म्हणून खाडीत नौका नेण्यात आल्या. मच्छीमारांची जीवाची घालमेल सुरू होती की आपली नौका खाडीत आली की नाही हे बघण्यासाठी पाजपंढरी येथील  ठिकाणी मच्छीमारांनी गर्दी केली होती. नौकामालक आणि मच्छिमार महिला देखील याठिकाणी देवाला हाका मारत होत्या. 

देवा आमची नौका खाडीत सुरक्षित येऊ दे. वादळ शांत होऊ दे रे देवा, अशी विनवणी करीत असताना सायंकाळ पर्यंत सर्वच नौका आंजर्ले खाडीत विसावल्या. समुद्रात गेलेल्या नौकांची देखील वादळापासून वाचण्यासाठी आंजर्ले खाडीत येण्यासाठी चांगलीच धावपळ उडाली. किमान २० ते २५ मिनिटे वादळाने चांगलाच जोर धरला होता. बंदरावरील असलेल्या छोट्या मोठ्या उद्योजकांची देखील धावपळ झाली.

अचानक आलेल्या वादळामुळे मच्छिमार प्रचंड नाराज झाले होते. कारण अजून शासन नियमाप्रमाणे अजून मासेमारी बंद व्हायला १० दिवस बाकी होते आणि वादळाने तोंडचं फोडले. आता कुठे चांगली पापलेट, कोळंबी, म्हाकुळ व  बिलजा सारखी मासळी मिळू लागली होती आणि वादळाने सुरुवात केली.

 राजापुर, रत्नागिरी व इतर तालुक्यांच्या  ठिकाणी देखील दुपारी अचानक ढगाळ वातावरण तयार होवून सोसाट्याचे वारे सुरू झाले. तर, काहीवेळातच वीजांच्या कडकडाटासह ढगांचा गडगडाटही सुरू झाला. त्याच्यासोबत मुसळधार पावसाला सुरूवात झाली. सुमारे तासाभरापेक्षा जास्त काळ पावसाचा जोर राहीला होता. त्यामध्ये सगळीकडे पाणीचपाणी झाले होते. दुपारच्यावेळी अचानक आलेल्या पावसाने सार्‍यांचीच तारांबळ उडाली. दुचाकीस्वारांसह पादचार्‍यांना छत्री अभावी भर पावसामध्ये भिजतच घर गाठावे लागले होते.

जोरदार बरसलेल्या पावसामुळे वातावरणामध्ये काहीसा थंडावा निर्माण झाल्याने गेल्या काही दिवसांपासून तीव्र उकाड्याने हैराण झालेल्यांना चांगलाच दिलासा मिळाला. दमदार पडलेल्या या पावसामुळे खालावलेले नैसर्गिक जलस्त्रोत वाढणार असल्याने शहरासह ग्रामीण भागामध्ये भेडसावत असलेल्या पाणीटंचाईला चांगलाच दिलासा मिळाला आहे. दरम्यान, नेहमीप्रमाणे आजही पावसाचा जोर वाढताच शहरासह ग्रामीण भागातील वीज गायब झाली होती. मात्र, पाऊस थांबल्यानंतर खंडीत झालेला वीजपुरवठा पुन्हा कार्यान्वित झाला होता.