हिंगोली :जिल्ह्यात गेल्या दहातासांपासून मुसळधार पावसाने पुन्हा एकदा थैमान घातले. शुक्रवारी रात्री मेघगर्जनेसह विजेच्या कडकडाटात पावसाने सुरुवात केली.शनिवारी दुपारी दोनवाजेपर्यंत जोर कायम होता. परिणामी नद्या-नाले दुथडी भरुन वाहू लागले आहेत. अनेक भागात पात्राबाहेर पाणी आल्याने जिल्ह्यातील प्रमुख मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. शेती शिवारात पाणी साचल्याने होते नव्हते तेवढे खरीप पीक पुराच्या पाण्यात वाहून गेले.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील कयाधू नदीला पूर आल्याने सालेगाव-सांडस मार्गावर वाहतूक ठप्प झाली. इसापुर धरणातून पाणी सोडल्यामुळे पेनगंगा नदीला पूर आला आहे. पुसद-कळमनुरी-हिंगोली मार्गावरील शेंबाळपिपरी जवळील पुलावरून पाणी वाहत असल्याने सकाळी सातपासून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. कयाधू नदीच्या पाण्याने पात्र सोडले आहे.

वसमत तालुक्यातील कुरुंदा गावातील एका वस्तीमध्ये घरे पाण्याखाली गेली असून गावकऱ्यांची तारांबळ उडाली .पांगराशिंदे गावा लगतच्या ओढ्याला पूर आल्याने काही घरांच्या उंबरठ्याला पाणी लागले असल्याचे स्थानिक सोपान शिंदे यांनी सांगितले. वापटी गावालगत असलेल्या ओढ्यावरच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने गावाचा संपर्क तुटल्याचे सांगण्यात आले.

कळमनुरी तालुक्यातील कुपटी गावालगतच्या तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले असून तलावाच्या एका कोपऱ्यातील भाग वाहून गेल्याने पाणी थेट शेतात शिरले आहे,अशी माहिती माजी सरपंच जुबेर पठाण व नदीम पठाण यांनी दिली. हिंगोली-समगा मार्गावरील लहान पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली. कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव गावातसुद्धा पाणी शिरले असून गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.