राज्यातील इतर भागात अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले असले तरी कोकणात शेतीचे फारसे नुकसान झालेले नाही. कोकणात खरीप हंगामात प्रामुख्याने भात आणि नाचणीची लागवड होत असल्याने, पिकांवर अतिवृष्टीचा फारसा परिणाम दिसून आलेला नाही. राज्यातील इतर भागांच्या तुलनेत कोकणातील पिक परिस्थिती चांगली आहे. मात्र आज पासून सुरू होणाऱ्या हस्त नक्षत्रावर मोठा पाऊस झाला तर हातातोंडाशी आलेल्या पिकाचे नुकसान होण्याची धास्ती शेतकऱ्यांना आहे.
कोकणात यंदा पावसाने मे महिन्यातच हजेरी लावली. लवकर आलेल्या पावसामुळे पेरणी उशीराने झाली. नंतर जून महिन्यात सुरवातीला पावसाने ओढ दिली. त्यामुळे यंदा भातलावणी उशीरा सुरू झाली मात्र नंतर समाधान कारक पाऊस पडत राहिला. त्यामुळे भात आणि नाचणी पिक जोमाने आले आहे. अतिवृष्टीचा काही प्रमाणात फटका बसला असला तरी त्याचा मोठा परिणाम शेतीवर झालेला नाही. मात्र २७ तारखेपासून सुरु होणाऱ्या हस्त नक्षत्र सुरु होत आहे. हस्त नक्षत्राला यंदा मोर वाहन असणार आहे. त्यामुळे पावसाचा जोर राहण्याची शक्यता असते. या नक्षत्रावर मोठा पाऊस झाला तर तो शेतीसाठी नासाडा पाऊस ठरणार आहे. दसऱ्यापासून कोकणात भात कापणीला सुरवात होणार आहे. या कालावधीत पाऊस झाला तर हाताशी आलेले पिक नष्ट होण्याची भिती शेतकऱ्यांना आहे.
रायगड जिल्ह्यात जून पासून सप्टेंबर पर्यंत १९७ हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे. १ हजार ४०० शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीचा सुमारे २४ हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे अशी माहिती कृषी अक्षिक्षक वंदना शिंदे यांनी दिली.सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, कुडाळ, वेंगुर्ला आणि वैभववाडी येथील भात शेतीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात दापोली मधील भाजीपाला लागवडीच्या क्षेत्राचे काही प्रमाणात नुकसान सोडले तर इतर ठिकाणी पिकांवर फारसा परिणाम झालेला नाही.
हस्त नक्षत्रावर पडणारा पाऊस हा कोकणातील शेतीसाठी नासाड्या पाऊस म्हणून समजला जातो. भात पिक कापणीसाठी तयार होत असताना, हा पाऊस पडतो. शेतीचे नुकसान होते खाता तोंडाशी आलेले पीक नष्ट होण्याची भीती असते.