हिंगोली : जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील शिवसेना (शिंदे) अन् भाजपमध्ये राजकीय फटाके फुटण्यास सुरवात झाली असून, दोन्ही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांनी स्वबळाचा नारा दिला आहे. महाविकास आघाडीने मात्र, एकत्रित निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकीत महायुतीबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद व पाच पंचायत समितीसह हिंगोली, कळमनुरी व वसमत नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना, या निवडणुकीसाठी राजकिय पक्षात रणधुमाळी सुरु झाली आहे. तर इच्छुकांनी आपापल्या प्रभागात दिवाळीच्या निमित्ताने मतदारांशी गाठीभेटी सुरू केल्या आहेत. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातील राजकिय फटाक्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.
शिवसेनेचे (शिंदे) जिल्हा प्रमुख तथा आमदार संतोष बांगर यांनी वसमत व कळमनुरी येथे आयोजित कार्यक्रमात स्वबळाचा नारा दिला आहे. तर हिंगोलीतही त्यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना शिवसेना आगामी पालिका निवडणूका व जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट करून तशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संमती घेतल्याचे सांगितले. निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने सक्षम उमेदवारांची चाचपणीही झाली असल्याचे स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार गजानन घुगे यांनीही आमची महायुतीत एकत्रित लढण्याची तयारी आहे. परंतु महायुती होत नसेल तर स्वबळावर निवडणुका लढविण्याची आमची तयारी असल्याचे स्पष्ट केले. महायुतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करूनच पुढील आदेशानुसार निर्णय घेतला जाणार आहे.
मात्र स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्णय झाल्यास आम्हीही पूर्ण ताकदीनिशी तयार आहोत, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच पालिका निवडणुकीत इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मागण्यास सुरवात केली आहे. त्यांच्या मुलाखती घेऊन त्यानंतरच पुढील निर्णय होणार असल्याचे घुगे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच शिंदेसेना व भाजपामध्ये राजकिय फटाके फुटण्यास सुरवात झाली आहे. तर राष्ट्रवादीने (अजित पवार) अद्यापही आपली अंतिम भूमिका स्पष्ट केली नाही. पक्षाच्या आढावा बैठकीत जिल्हाध्यक्ष बी. डी. बांगर यांनी सुद्धा महायुती होत नसेल तर आम्ही स्वबळावर निवडणूकांना सामोरे जाऊ असे सांगितले. महायुतीतील तीन पक्षांची भूमिका लक्षात घेता महायुती होणार की नाही याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्रित लढवण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीच्या जिल्हा समन्वयक प्रमुखपदी दांडेगावकर यांची एकमताने निवड करण्यात आली.
