Maharashtra Honeytrapped case: महाराष्ट्रातील प्रशासनात काम करणाऱ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना हनीट्रॅपच्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप एका महिलेवर होत आहे. विशेष म्हणजे २०१६ साली एका खंडणी प्रकरणात सदर महिलेला अटक झाली होती. इंडिया टुडेने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. तसेच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी माध्यमांसमोर यावर प्रतिक्रिया दिली आहे. या बातमीमुळे राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ माजली. दरम्यान काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी आज (दि. १६ जुलै) विधानसभेत सदर प्रश्न मांडला आणि सरकारला यावर भूमिका मांडण्याची मागणी केली.

इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार, आरोपी महिला स्वतःला गरजू असल्याचे भासवून अधिकाऱ्यांशी संपर्क साधायची. ती वरिष्ठ आयपीएस अधिकारी व विविध विभागातील सनदी अधिकारी, मुख्याध्यापक यांना हनीट्रॅपच्या जाळ्यात ओढत असे. त्यानंतर खंडणी उकळण्यासाठी त्यांच्यावर खोटे आरोप करत असे.

सत्र न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, सदर महिलेने यापूर्वी अनेक अधिकाऱ्यांविरुद्ध बलात्काराचे आरोप केले होते. परंतु नंतर परस्पर सहमतीने आरोप मागेही घेतले. अनेक प्रकरणात पीडितांनी सामाजिक लज्जा आणि कारकिर्दीचे नुकसान होऊ नये, या भीतीने मौन बाळगले असल्याचे सांगितले जाते.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तात आरोपी महिलेच्या गुन्ह्याची पद्धतही विशद करण्यात आली आहे. विधवा किंवा गरीब असल्याचे भासवून मदतीच्या बहाण्याने सदर महिला अधिकाऱ्यांच्या संपर्कात येत असे. त्यानंतर सुरुवातील व्हॉट्सअपवरील संभाषण, नंतर व्हिडीओ कॉल आणि वैयक्तिक भेटीतून अधिकाऱ्यांचा विश्वास संपादित केला जायचा.

प्रत्यक्ष भेटीदरम्यान महिलेकडून छुप्या पद्धतीने खासगी क्षणाचे फोटो आणि व्हिडीओ काढले जायचे. याच गोष्टींचा नंतर खंडणी उकळण्यासाठी वापर केला जात असे. सामाजिक बदनामी आणि कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी अधिकाऱ्यांना कोंडीत पकडले जायचे.

सदर महिलेने मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकमधील अधिकाऱ्यांना आपल्या जाळ्यात ओढल्याचे सांगितले जात आहे. २०१६ साली खंडणी उकळल्याप्रकरणी महिलेवर कारवाई झाल्यानंतरही नवी ओळख धारण करत महिलेने सदर कृत्य केल्याचे सांगितले जात आहे.

गृहराज्यमंत्री योगेश कदम काय म्हणाले?

माध्यमांशी बोलत असताना गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, या विषयाची प्रथमदर्शनी माहिती घेतली असता ठाण्यात अशी तक्रार दाखल झाली होती. मात्र नंतर परस्पर सहमतीने सदर तक्रार मागे घेतली गेली. त्यानंतर कुठेही अशा प्रकारची तक्रार दाखल झालेली नाही.

राज्यातील ७२ अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात

राज्यातील ७२ हून अधिक अधिकारी, काही मंत्री हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकले आहेत. हनीट्रॅप करणाऱ्यांकडून गोपनीय माहिती गोळा केली जात आहे. तसेच काही अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्यात आले असून त्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा विचार केला. सरकार यावर काही बोलायला तयार नाही. त्यामुळे आज मी हा विषय विधानसभेत मांडला, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिली.