रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथे जन सागर उसळला आहे. येथील हॉटेल्स, लॉज व घरगुती निवास ठिकाणे हाऊस फुल्ल झाली आहेत. वाहनाच्या तीन ते चार किलोमीटर पर्यत रांगा लागल्याने वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी व पर्यटकांच्या सुरक्षितेसाठी जादा पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे. तसेच येथील समुद्रात आंघोळीसाठी उतरलेल्या तीन पैकी दोघा पर्यटकांना आपला जीव गमावण्याची वेळ आली आहे. तर एकाला वाचविण्यात यश आले आहे.
सलग आलेल्या दीवाली सुट्ट्यांमुळे गणपतीपुळे येथे गणेश भक्तांची मोठी गर्दी उसळली आहे. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी कोकणातील रत्नागिरीत असलेले हे गणपतीपुळे तीर्थक्षेत्र पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाले आहे. रत्नागिरीतील आरेवारे, गणपतीपूळे व मालगुंड या ठिकाणी पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचे पहावयास मिळत होते. गणपतीपुळे मार्गावर पर्यटकांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. गणपतीपुळे भागात मोठी गर्दी झाल्याने सर्वांनाच वाहतुक कोंडीचा सामना करावा लागला.
गणेश भक्तांची वाढती संख्या बघता रत्नागिरी पोलीस दलाची जादा कुमक मागविण्यात आली. मात्र येथील वाहतुक कोंडी सोडविताना पोलीसांची चांगलीच दमछाक झाली. गणपतीपुळे मंदिर परिसर व समुद्र किनारी पोलीस पथके तैनात करण्यात आली. तरीही पर्यटकांच्या अतिउत्साहीपणामुळे आंघोळीसाठी समुद्रात उतरलेल्या तिघांपैकी दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र एकाला वाचविण्यात यश आले आहे.
निखिल शिवाजी वाघमारे (वय १८) रा. केशवनगर सर्वे नंबर ५, घडसाशी डेरीजवळ, केशवनगर, मुंढवा, पुणे या ठिकाणाहून तो आपल्या कुटुंबासह गणपतीपुळे येथे आला होता. गणपतीपुळे येथे शुक्रवारी निखिल व त्याचे आईवडील, दोन बहिणी व अन्य नातेवाईक गणपतीपुळे येथे देवदर्शन व पर्यटन केल्यावर सर्वजण शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास गणपतीपुळे समुद्रात समुद्रस्नानासाठी उतरले. त्यातील निखिल हा त्यावेळी बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच त्यांनी स्थानिक व्यावसायिक, जीवरक्षक व पोलीस यंत्रणेला याबाबत माहिती दिली. त्यानंतर त्याचा समुद्रात शोध घेतला असता तो आढळून आला नाही.
शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत आणि शनिवारी दुपारपर्यंत गणपतीपुळे पोलीस ठाण्याचे कर्मचारी, गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक आणि स्थानिक व्यावसायिक व ग्रामस्थ यांच्या मदतीने त्याचा शोध सुरू असताना तो शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास मालगुंड गायवाडी समुद्रकिनारी मृतावस्थेत आढळून आला. तसेच शनिवारी येथील समुद्रामध्ये सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान पेण रायगड येथील कुटुंब समुद्राच्या पाण्यात अंघोळीसाठी उतरले असता आयांश नितीन पवार वय अडीच वर्ष तसेच वडील नितीन शंकर पवार (वय ३५ वर्षे) रा. अमरापूर पेण, जिल्हा रायगड हे दोघे बुडाले. यामध्ये मुलगा आयांश याला फोटोग्राफर व्यावसायिक रोहित चव्हाण यांनी प्रसंगावधान दाखवून समुद्रात उडी घेऊन वाचवले. तर वडील नितीन शंकर पवार हे समुद्राच्या पाण्यात बेपत्ता झाल्याने गणपतीपुळे जीवरक्षक, व्यावसायिक ग्रामस्थ व पोलीस कर्मचारी शोध घेत आहेत.
आयांश याला वाचवल्यानंतर समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या डॉ. प्रणाली भरदारे भिवशी निपाणी बेळगांव यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्याला गणपतीपुळे येथील खासगी रिक्षा ने ताबडतोब मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेण्यात आले. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनीता पवार यांनी तत्काळ त्याच्यावर उपचार करून त्यानंतर त्याला अधिक उपचारासाठी रत्नागिरी शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. याबाबत अधिक तपास जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील व त्यांचे सहकारी करीत आहेत.
