Ajit pawar son Jay Pawar: बारमती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची करूनही अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पराभव स्वीकारावा लागला. २०१९ साली मुलगा पार्थ पवार आणि त्यानंतर २०२४ साली पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यामुळे अजित पवारांना हा दुहेरी धक्का बसला होता. त्यानंतर बारामती विधानसभेत सख्खा पुतण्या युगेंद्र पवार विधानसभा निवडणुकीची तयारी करत असल्याची बातमी समोर आली. युगेंद्र पवार यांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीही सुरू केल्या असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर अजित पवार गटातून जय पवार यांना बारामतीमधून उमेदवारी द्यावी, अशी मागणी पुढे येत होती. या मागणीवर आज अजित पवार यांनी मोठे भाष्य केले आहे. अजित पवार नेमके काय म्हणाले? पुण्यामध्ये ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत असताना अजित पवारांना जय पवार यांच्या उमेदवारीबाबत कार्यकर्ते मागणी करत आहेत, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी या प्रश्नाचे उत्तर देत असताना ते म्हणाले, "शेवटी लोकशाही आहे. मला तरी निवडणूक लढण्यात रस नाही. मी तिथे सात-आठ वेळा निवडणुकीला उभा राहिलो आहे. जनतेचा कौल असेल त्याप्रमाणे आमच्या पक्षाचे संसदीय समिती त्याचा निर्णय घेईल. स्थानिक कार्यकर्ते आणि पक्ष संघटना जो निर्णय घेईल, तो आम्ही मान्य करू." हे वाचा >> अजित पवारांना चूक मान्य, “सुप्रियाविरोधात सुनेत्राला उमेदवारी द्यायला नको होती, कारण…” दोन दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीबाबत आश्चर्यकारक विधान केले होते. ते म्हणाले, "लोकसभा निवडणुकीच्या वेळी माझ्याकडून थोडी चूक झाली. मी माझ्या बहिणीच्या (सुप्रिया सुळे) विरोधात सुनेत्राला उभे करायला नको होते. पण त्यावेळेस तसे झाले. पार्लमेंट्री बोर्डाने तो निर्णय घेतला होता. आता जे झाले ते झाले, बाण सुटलेला आहे. आज मला माझे मन सांगते की तसे व्हायला नको होते." कर्जत-जामखेडमध्ये दोन पवारांमध्ये लढत? अजित पवार यांच्या या भूमिकेनंतर आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीका केली. "अजित पवार यांनी पवारसाहेबांना सोडून भाजपाचं मांडलिकत्व स्वीकारले आणि क्षमता असलेला नेता बळीचा बकरा ठरला याचं दुःख मला कायम राहील", असे रोहित पवार यांनी म्हटले. "कर्जत-जामखेड मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत बारामतीप्रमाणेच पुन्हा एकदा दोन पवारांमध्ये संघर्ष होणार आहे आणि त्यासाठी भाजपमधून अजित पवार यांच्यावर दबाव आणण्यात येत आहे", असाही आरोप रोहित पवार यांनी केला.