राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना काही दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाली होती. त्यामुळे बरेच दिवस ते सक्रिय राजकारणातून बाहेर होते. त्याच काळात मराठा आंदोलन पेटले होते. तसंच, अनेक महत्त्वाचेही मुद्दे चालू होते. या प्रकरणी अजित पवारांची कोणतीही राजकीय प्रतिक्रिया न आल्याने पवारांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. यावरून, अजित पवारांनी आता सडेतोड उत्तर दिलं आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे आयोजित केलेल्या निर्धार सभेत ते बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या विविध जाती-जातीत वाद सुरू असून प्रत्येकाला आरक्षण हवंय. कोणावरही अन्याय होणार नाही. इतरांना दिलेल्या आरक्षणाला धक्का न लागता राहिलेल्यांना संधी मिळाली पाहिजे अशी भूमिका सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आली, असं अजित पवार म्हणाले.

हेही वाचा >> “आम्ही साधू-संत नाही, अनेक वर्ष…”, कर्जतमध्ये जाहीर सभेत अजित पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “राज्याच्या जनतेला सांगतो की…”

पुढे ते म्हणाले की, एखाद्याचे विचार पटले नाहीत तर विचारांची देवाण-घेवाण होऊ शकते. मध्ये मला डेंग्यु झाला. मला विकनेस आला होता. डॉक्टरांनी मला काळजी घ्यायला सांगितली होती. त्या पद्धतीने मी काळजी घेतली. पण अनेकांनी म्हटलं की अजित पवारांना राजकीय आजार झाला. मी काही लेचापेचा राहिलो नाही राजकीय आजार व्हायला. जे काही आज असेल ते तोंडावर बोलणारा माणूस आहे.

अजित पवार म्हणाले की, मधल्या काळात काही राजकीय बदल झाले. त्याबाबत बराच उहापोह झाला. सगळ्यांना सांगायचं आहे की, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या विचारांवर चालणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. या जिल्ह्यात समुद्रकिनारा आहे. डोंगराळ भाग आहे. नागरिकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे. रेल्वे गेली आहे. रस्त्यांचं जाळं निर्माण झालं आहे. पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ व्हावं. अनेक मह्तत्वाच्या भागांना जोडणारं काम होत आहे. पुणे, नगर जिल्ह्यांतून घाटातून येताना लोकांना त्रास होतो. तेथेही काही व्यवस्था करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. इथल्या लोकांना रोजगार निर्माण झाला पाहिजे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I am not lechapecha ajit pawars sharp reply to criticism of political sickness said whatever sgk