“लोकसभेत भाजपाचा अध्यक्ष नेमला गेला तर महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जसे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश डावलून राजकीय पक्षांची फोडाफोड केली. तसाच प्रकार लोकसभेत होण्याची शक्यता आहे. भाजपाचा खासदार अध्यक्षपदी आला तर तो नितीश कुमार यांच्या जेडीएस आणि एन. चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षामध्ये फूट पाडू शकतो. त्यामुळे तेलगू देसम पक्षाने लोकसभा अध्यक्ष्याच्या पदासाठी आपला उमेदवार दिला तर त्याला निवडून आणण्यासाठी इंडिया आघाडी नक्कीच चर्चा करेल”, अशी भूमिका शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना मांडली. तसेच कायद्याने उपाध्यक्ष पद विरोधकांनाच मिळाले पाहीजे, असेही त्यांनी म्हटले.

भाजपा एनडीएतील पक्षात फोडाफोडी करू शकतो

संजय राऊत पुढे म्हणाले, तेलगू देसम पक्षाच्या (टीडीपी) चंद्राबाबू नायडू यांनी लोकसभेचे अध्यक्षपद मागितले आहे. तशी मागणीच त्यांनी एनडीएत सामील होण्यासाठी घातली होती, अशी माहिती मिळत आहे. जर हे अध्यक्षपद एनडीएला मिळाले नाही, तर चंद्राबाबू नायडू उमेदवार उभे करतील. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री हे टीडीपी पक्षात फूट पाडू शकतात. नितीश कुमार, चिराग पासवान, जयंत चौधरी यांचेही पक्ष भाजपा फोडू शकतो. कारण ज्यांचे मीठ खावे, त्यांच्यातच फोडाफोड करावी, अशी भाजपाची परंपरा आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

सरकार कधीही पडू शकते

संजय राऊत यांनी सरकार पडण्याबाबतही सुतोवाच केले. ते म्हणाले, लोकसभेत आता २०१४ आणि २०१९ सारखी परिस्थिती नाही. राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे आम्ही कधीही सरकार पाडू शकतो. एनडीएचे सरकार स्थिर नाही. आमच्या मनात आले तर आम्ही आमचे बहुमत संसदेत सिद्ध करू शकतो.

सरसंघचालक मोहन भागवतांची योगी आदित्यनाथ यांच्याशी बंद दाराआड चर्चा; लोकसभा निकालांनंतर बैठक, अनेकांच्या भुवया उंचावल्या!

संघाला चूक दुरूस्त करण्याची संधी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची बंद दाराआड चर्चा केली. मात्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली नाही. याबाबत प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले, देशातली लोकशाही आणि संविधान वाचविण्याची भूमिका संघाला घ्यावी लागेल. मागच्या दहा वर्षात देशाचे जे नुकसान झाले, त्यात संघाचाही सहभाग होता. मोदी आणि शाह यांनी लोकशाही, देशातील जनतेचे नुकसान केले आहे. आरएसएसच्या समर्थनामुळेच हे सरकार बनले. जर संघ आता स्वतःची चूक दुरूस्त करत असेल तर ही चांगली बाब आहे.