मनोज जरांगे पाटलांनी सत्ताधाऱ्यांविरोधात शड्डू ठोकला आहे. सध्या त्यांनी तात्पुरतं त्यांचं उपोषण स्थगित केलं असलं तरीही आरक्षण मिळेपर्यंत साखळी उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातही त्यांनी अपशब्द वापरल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. यादरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हीडिओ व्हायरल होतोय. या व्हीडिओवरून काँग्रेसने महायुती सरकारला लक्ष्य केलं आहे.

“मला सलाईनच्या माध्यमातून विष देण्याचा प्रयत्न केला जातोय. तसेच एन्काऊंटर करून मला मारून टाकण्याचा फडणवीसांचा विचार आहे”, असा आरोप मनोज जरांगेंनी केला होता. तसंच, देवेंद्र फडणवीसांना आव्हान देऊन ते सागर बंगल्यावर जाण्यासही निघाले होते. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांबाबत अपशब्द उच्चारले होते. मनोज जरांगे यांच्या या कृत्यामुळे त्यांच्यावर सत्त्याधाऱ्यांनी तोंडसुख घेतलं आहे. आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही सत्ताधाऱ्यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी लावून धरली. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या आंदोलनाची एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा >> फडणवीसांचा विधानसभेतून हल्लाबोल अन् मनोज जरांगेंनी मागितली माफी; म्हणाले “उपोषणावेळी अनावधानाने…”

दरम्यान, मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली. यावेळी मर्यादेच्या बाहेर गेलं की कार्यक्रम करतोच, असा उच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. यावरून महाराष्ट्र काँग्रेसने हा व्हीडिओ एक्सवर शेअर करत सरकारवर टीका केली आहे.

“कार्यक्रम म्हणजे काय समजायचं साहेब? मुख्यमंत्री साहेब!, ही धमकी आहे का? उद्या जर जरांगे पाटलांचा जीव गेला तर मुख्यमंत्री जबाबदार असणार का?”, असा प्रश्न महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत एक्स खात्यावरून विचारण्यात आला आहे.

मनोज जरांगेंनी मागितली माफी

मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या त्या वक्तव्यावरून त्यांनी माफी मागितली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांबद्दल असे शब्द निघाले असतील तर मी ते शब्द मागे घेतो. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आई बहिणीपेक्षा आम्हाला दुसरं काहीच मोठं नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारे लोक आहोत. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन निघालो आहोत. त्यामुळे अनावधानाने कोणाच्याही आई-बहिणीवरून तोंडून काही चुकीचे शब्द गेले असतील तर मी १०० टक्के ते शब्द मागे घेतो आणि दिलगिरी व्यक्त करतो.” मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगर येथे टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.