अहिल्यानगर:आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (अजित पवार गट) कटिबद्ध झाला आहे. महायुतीचा घटक पक्ष असल्याने निवडणुका महायुतीतच लढणार आहोत. जागावाटपासाठी घटक पक्षांशी चर्चा होईल. मात्र, जेथे राष्ट्रवादीची जास्त ताकद आहे तेथे आम्ही प्रबळ दावा करू. जर सन्मानाने जागा मिळाल्या नाही तर तेथे स्वबळावर लढत करण्याचीही पक्षाची तयारी आहे. मात्र, त्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचा आदेश अंतिम राहील, असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांनी केले.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांचे नियोजन व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या २९ ऑगस्टला होणाऱ्या श्रीगोंदा दौऱ्यासाठी पक्षाची बैठक शहरातील सरकारी विश्रामगृहावर झाली. जिल्हाध्यक्ष सावंत त्यावेळी बोलत होते. आमदार संग्राम जगताप, आमदार काशिनाथ दाते, माजी आमदार चंद्रशेखर घुले व राहुल जगताप, पणन महामंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, श्रीगोंदा साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, राहुरी साखर कारखान्याचे अध्यक्ष अरुण तनपुरे, माजी जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, संतोष धुमाळ, आशा निंबाळकर, अजित कदम आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
अशोक सावंत पुढे म्हणाले, राष्ट्रवादीची राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील सभासद नोंदणी जिल्ह्याच्या दक्षिण भागात होणार आहे. निवडणुकांच्या तयारीसाठी दि. १ सप्टेंबरपासून नगर शहरासह दक्षिण भागातील आठही तालुक्यांमध्ये मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढली असून, आगामी निवडणुकांमध्ये पक्ष नगर जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा राहील. महापालिकेसह जिल्हा परिषद व पंचायत समितीवरही राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल. यावेळी जिल्ह्यातील पक्ष संघटना बांधणीचा आढावा घेण्यात आला.
उपमुख्यमंत्री पवार २९ ऑगस्टला श्रीगोंदा तालुका दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याचे व होणाऱ्या मेळाव्याचे नियोजन बैठकीत करण्यात आले. मेळाव्यात पक्ष मोठे शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे सावंत यांनी सांगितले. जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे यांनी आभार मानले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या जोरबैठका काढणे सुरू झाले आहे.