अकोले: दिवंगत मंत्री मधुकरराव पिचड यांची नात गिरिजा पिचड- म्हात्रे यांनी काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत मुंबईत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. गिरिजा पिचड यांचा काँग्रेस पक्ष प्रवेश हा भाजपमध्ये असणारे त्यांचे काका माजी आमदार वैभव पिचड यांना धक्का मानला जातो.
गिरिजा पिचड यांनी काही दिवसांपूर्वी संगमनेर येथे येत बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली होती. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्यामुळे तालुक्याच्या राजकारणात खळबळ निर्माण झाली. मात्र, ही फक्त सदिच्छा भेट असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. मात्र, आज आपल्या काकांना राजकीय धक्का देत त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत तेव्हाची भेट केवळ सदिच्छा भेट नव्हती, हे जणू दाखवून दिले.
गिरिजा ही दिवंगत मधुकरराव पिचड यांचे ज्येष्ठ चिरंजीव हेमंत यांची कन्या तसेच माजी आमदार वैभव पिचड यांची पुतणी आहे. मुंबईमध्ये राहत असल्यामुळे अकोल्याशी त्यांचा विशेष संपर्क नाही. मात्र, विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे राहिलेले वैभव पिचड यांच्या प्रचारात सक्रिय होत तालुक्याचा मोठा भाग पिंजून काढला होता. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजी नेहे यांनी समाज माध्यमातून या पक्षप्रवेशाची माहिती दिली.
अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी आरक्षित आहे. जिल्ह्यातील या सर्वांसाठी राखीव असणाऱ्या ७ पैकी ५ जागा अकोले तालुक्यातील आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेचा पुढील अध्यक्ष हा बहुदा तालुक्यातीलच असणार आहे. सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष तालुक्याकडे असून, अध्यक्षपदासाठी सक्षम उमेदवाराच्या शोधात प्रमुख पक्ष आहेत.
काँग्रेसकडून उमेदवारीची शक्यता
पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या पुढाकारातून काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेत्या सुनीता भांगरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला. अध्यक्ष पदाच्या संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. आता भाजपमध्ये असणाऱ्या वैभव पिचड यांच्या पुतणीने काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्या पुढील भूमिकेकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरतात की नाही, हे लवकरच स्पष्ट होईल. अकोले तालुक्यात काँग्रेसची ताकद तशी मर्यादित आहे. मात्र, तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गटांबरोबरच संगमनेरच्या पठार भागातील गटही अनुसूचित जमाती महिलेसाठी आरक्षित आहे. निवडणूक लढविली तर बहुदा याच गटाच्या त्या उमेदवार असतील.
