नांदेड – अतिवृष्टीमुळे तुडूंब भरलेल्या लोहा तालुक्‍यातील किवळा येथील तलावाशेजारी सेल्फी घेण्यासाठी दोन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडाल्याने मृत्‍यू झाला. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली.

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नदीनाले तुडुंब भरून वाहत आहेत. काही गावातील तलावही पूर्णतः भरले आहेत. वेगवेगळ्या भागातील धबधबे पर्यटकांना खुणावत आहेत.

लोहा तालुक्‍यातल्या किवळा येथील भरलेला तलाव पाहण्यासाठी शे.बाबर शे. जफर (वय १५, रा.बळीरामपूर, नांदेड) व मो.रिहान म. युसूफ (वय १६, उमरकॉलनी, देगलूरनाका) हे काही मित्रांसोबत गुरुवारी सायंकाळी किवळा तलावाजवळ गेले होते. तेथे फोटो काढत असतानाच त्‍यात दोघांचा पाय घसरल्याने ते पाण्यात पडले. पाण्याचा अंदाज न आल्याने व त्‍यांना पोहता येत नसल्याने दोघांचा मृत्‍यू झाला. इतरांनी आरडा ओरडा केल्यानंतर सोनखेड पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी जीवरक्षक तरुणांना पाचारण केले. रात्री उशिरा त्‍या दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले.

शुक्रवारी उत्तरीय तपासणी व कायदेशीर सोपस्‍कार पूर्ण केल्यानंतर दोघांच्‍या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्‍यसंस्‍कार करण्यात आले. पोलीस उपअधीक्षक प्रशांत शिंदे, सोनखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने हे रात्री उशिरापर्यंत आपल्या पथकासमवेत तळ ठोकून होते. सोनखेड पोलिसांनी या प्रकरणी आकस्‍मिक मृत्‍यूची नोंद केली आहे. नांदेड जिल्ह्याच्‍या वेगवेगळ्या भागात पावसामुळे तलाव, धबधबे ओसंडून वाहत आहेत. फोटो काढण्याच्‍या मोहात न अडकता आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.