परभणी : तालुक्यातील झिरो फाटा येथील एका खासगी निवासी शाळेत विद्यार्थ्याचा दाखला (टिसी) मागितल्याच्या कारणावरून संस्था चालकाने पालकाला बेदम मारहाण केली. या घटनेत पालकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. या प्रकरणी संस्थाचालकासह एकावर पूर्णा पोलिसात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

झिरो फाटा परिसरात बाळकृष्ण शिक्षण संस्थेची हायटेक निवासी शाळा आहे. या शाळेत मागील काही दिवसांपूर्वी उखळद (ता.पूर्णा) येथील जगन्नाथ पांडुरंग हेंडगे यांनी आपली मुलगी पल्लवी हिला हायटेक निवासी शाळेत दाखल केले होते. मात्र एका आठवड्यातच मुलीचे मन लागत नसल्याने पालक जगन्नाथ हेंडगे आणि नातेवाईक गुरुवारी सायंकाळी शाळेत दाखला काढण्यासाठी आले. संस्थाचालकांना दाखला देण्याची विनंती केली.

परंतु संस्थाचालक प्रभाकर चव्हाण व त्यांच्या पत्नीने जगन्नाथ हेंडगे यांना लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केली. येथून ते कसेबसे बाहेर पडले असता नातेवाईक व उपस्थितांनी त्यांना परभणी येथे शासकीय रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी मुंजाजी हेंडगे यांच्या फिर्यादीवरून संस्थाचालक प्रभाकर चव्हाण व त्यांच्या पत्नीविरुध्द पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान उपविभागीय अधिकारी समाधान पाटील, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांनी घटनास्थळी भेट दिली. शुक्रवारी सकाळपासूनच शाळा व परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मृत जगन्नाथ हेंडगे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.