सांगली : जत तालुक्यातील प्रश्‍नांची जाण असलेला स्थानिक उमेदवारच भाजपने द्यावा, केवळ आमदारकीसाठी लुडबूड करणार्‍यांना पक्षाचे कार्यकर्ते सहकार्य करणार नाहीत अशी भूमिका भाजप व शिवसेना पदाधिकार्‍यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केली. या बैठकीत एकप्रकारे आमदार गोपीचंद पडळकर यांना भाजपची उमेदवारी देण्यास अप्रत्यक्ष विरोध दर्शवण्यात आला.

लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विधानसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून आमदार पडळकर यांनी एक जूनपासून जत तालुययाचा दौरा आयोजित केला आहे. या पार्श्‍वभूमीवर तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी पत्रकार बैठकीत आपली भूमिका स्पष्ट केली. या बैठकीस नगरपालिकेचे माजी सभापती टिमू एडके, सरपंच परिषदेचे माजी तालुकाध्यक्ष बसवराज पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख निवृत्ती शिंदे, बाजचे माजी सरपंच संजय गडदे, भाजपचे शेतकरी आघाडीचे प्रमुख हणमंत गडदे, राजू पुजारी, आसंगी तुर्कचे सरपंच मिरासाहेब मुजावर, कुंभारीचे माजी उपसरपंच प्रदीप जाधव, जाडरबोबलादचे उपसरपंच प्रकाश काटे आदी उपस्थित होते.

हेही वाचा : सांगली: पाण्यासाठी तासगाव तालुक्यात शेतकरी आक्रमक, पोलीसांशी झटापट

यावेळी शिंदे म्हणाले, स्थानिक प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी स्थानिकच उमेदवार असणे गरजेचे आहे. तसेच उमेदवाराने आतापर्यंत तालुक्यासाठी केलेल्या कामाचेही मोजमाप होणे आवश्यक आहे. वरून लादलेले नेतृत्व जनता स्वीकारणार नाही, तसेच उपरा उमेदवारही जतची स्वाभिमानी जनता सहन करणार नाही. जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि केंद्रिय रस्ते विकास महामंडळाचे संचालक तमणगोंडा रविपाटील यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास कामे तर केली आहेतच, याचबरोबर जत शहरातील भुयारी गटार योजनेसाठी निधी उपलब्ध केला आहे. तसेच बालगाव येथे 30 कोटींचा बेदाणा प्रकल्प उभा केला आहे. पक्षाने विधानसभा क्षेत्रप्रमुख पदाची दिलेली जबाबदारीही त्यांनी सक्षमपणे पार पाडली असल्याने त्यांच्याच नावाचा पक्षाने प्राधान्याने विचार करावा. यासाठी लवकरच एक शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.