राजापूर : सिंधुदूर्ग जिल्ह्यातील पुरातत्व आणि कातळशिल्प संशोधक सतीश लळीत यांनी कोकणातील पहिल्या महापाषाण संस्कृतीकालीन एकाश्मस्तंभ स्मारकांचा शोध लावला आहे. राजापूरातील कुंभवडे येथील श्री गंभीरेश्वर मंदिराजवळ जांभ्या दगडाची सात एकाश्मस्तंभ स्मारके लळीत यांनी शोधली असून ही स्मारके म्हणजे एकाच दगडातून खोदून काढून उभे केलेले पाषाण आहे. इ.स.पू. १ हजार ४०० ते ५०० वर्षे हा महापाषाण संस्कृतीचा (मेगालिथिक कल्चर) काळ मानला जात असून हा मानवी विकासाच्या वाटचालीतील एक महत्वाचा कालखंड आहे. त्यामुळे लळीत यांनी शोधलेल्या एकाश्मस्तंभ स्मारकांद्वारे कोकणच्या प्राचीन इतिहासाचा उलगडा होण्यास वा नवा प्रकाशझोत पडण्यास एकप्रकारे मदत होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे येथील सिंहगड इन्स्टिट्यूटच्या श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे भारतीय मूर्तीशास्त्र व स्थापत्य संशोधन परिषदेचे (इंडियन स्कल्प्चर अँड आर्किटेक्चर रिसर्च कौन्सिल, आय-एसएआरसी) येथे पाचवे राष्ट्रीय अधिवेशन झाले. बनारस हिंदु विद्यापीठाचे प्रा. शांती स्वरुप सिन्हा सत्रप्रमुख आणि डॉ. अरविंद सोनटक्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेत लळीत यांनी एकाश्मस्तंभ स्मारक संशोधनाचा आपला शोधनिबंध सादर केला. कोकणचा प्रागैतिहास अद्याप अज्ञात असून सुसरोंडी (गुहागर) आणि कोळोशी (कणकवली) येथील मानवी वसतिस्थाने असलेल्या गुहा या दोन अतिप्राचीन काळातील संदर्भांशिवाय पश्चिम किनारपट्टीवरील कोकण प्रदेशात अश्मयुगात मानवी वस्ती असल्याचे कोणतेही पुरावे सापडलेले नव्हते. काही वर्षांपुर्वी मध्याश्मयुगाच्या शेवटच्या व नवाश्मयुगाच्या काळातील कातळशिल्पे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात सापडल्याने कोकणातील मानवी अस्तित्वाच्या वाटचालीतील एक महत्वाचा दुवा सापडला आहे. त्यानंतर, राजापूरातील कुंभवडे येथे महापाषाण काळातील एकाश्मस्तंभ आढळल्याची माहिती लळीत यांनी देताना कोकणात एकाश्मस्तंभ आढळल्याची ही पहिलीच घटना असल्याचेही स्पष्ट केले.

हेही वाचा : Sanjay Raut on MVA: महाविकास आघाडी फुटली का? संजय राऊतांनी केलं स्पष्ट; म्हणाले, “आम्ही भाजपामध्ये असताना…”

कुंभवडे येथे आढळलेले सात एकाश्मस्तंभ श्री गंभीरेश्वर मंदिर (गांगो मंदिर) परिसरात तीन गटात विभागलेले आहेत. सात स्तंभांपैकी पाच उभ्या स्थितीत असून दोन निखळून पडलेल्या आडव्या स्थितीत आहेत. मंदिरासमोरुन नाणार फाटा – कुंभवडे – उपळे जाणार्‍या रस्त्यावर मंदिराकडे वळणार्‍या फाट्यावर दोन स्तंभ आहेत. मध्यम आकाराचा एक स्तंभ उभा असून दुसरा मोठ्या आकाराचा स्तंभ आडवा पडला आहे. याच रस्त्याने सुमारे तिनशे मीटर पुढे गेल्यावर रस्त्याच्या कडेला पाण्याच्या टाकीजवळ एक मध्यम आकाराचा पाषाणस्तंभ उभ्या स्थितीत आहे. मंदिराच्या पश्चिम बाजुला सुमारे तिनशे मीटर अंतरावर असलेल्या एका मळ्यात एकुण चार पाषाणस्तंभ पहायला मिळतात. यापैकी दोन लहान आकाराचे, एक मध्यम आकाराचा तर एक मोठ्या आकाराचा आहे. या चार पाषाणस्तंभापैकी लहान आकाराचा एक आडवा पडलेला असुन तीन उभ्या स्थितीत आहेत. हे एकाश्मस्तंभ स्थानिक उपलब्ध असलेल्या जांभ्या दगडांमधुन खोदून काढलेले आहेत. उभ्या असलेल्या सर्व पाषाणस्तंभांची दिशा पूर्व-पश्चिम आहे. सर्वात लहान एकाश्मस्तंभाची उंची २.५ फुट, रुंदी २ फुट व जाडी ५ इंच आहे. सर्वात मोठ्या एकाश्मस्तंभाची उंची सव्वा आठ फुट, रुंदी ३ फुट व जाडी १० इंच असल्याची माहिती श्री. लळीत यांनी दिली.

“ कोकण प्रदेशातील प्रागैतिहासिक काळातील, प्राचीन काळातील मानवी संस्कृतींचा शोध घेण्यासाठी अत्यंत कमी साधने आणि संदर्भ उपलब्ध असल्यामुळे हा काळ यादृष्टीने अंधारयुग (डार्क एज) म्हणून ओळखला जातो. मात्र गेल्या काही वर्षात गुहांची मानवी वसतिस्थाने, शिळावर्तुळे, कातळशिल्पे असे अनेक संदर्भ उजेडात येऊ लागले आहेत. कुंभवडे येथील महापाषाणकालीन एकाश्मस्तंभांच्या (मेनहिर) या शोधामुळे या साखळीतील आणखी एक महत्वाचा दुवा मिळाला आहे. महापाषाणकालीन एकाश्मस्तंभ महापाषाण काळात पश्‍चिम किनारपट्टीवर वसलेल्या मानवी समुहांच्या, तत्कालीन संस्कृतींच्या चालीरीती, श्रद्धा, उपासना पद्धती यांच्या अभ्यासात महत्वाचा दुवा ठरणार आहे. यांचे शासनाने जतन अन् संवर्धन करताना ही ठिकाणे राज्य संरक्षित स्मारके म्हणून जाहीर करणे गरजेचे आहे. ”

सतीश लळीत, संशोधक

हेही वाचा : Sharad Pawar : बीडप्रकरणी शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन; म्हणाले, “राजकारणात मतभेद असतील-नसतील, पण…”

● राजापूरातील कुंभवडे येथे आढळले सात एकाश्मस्तंभ, कातळशिल्प अभ्यासक सतीश लळीत यांनी लावला शोध

● कोकणात एकाश्मस्तंभ आढळल्याची पहिलीच घटना.

● कोकणाच्या प्राचीन संस्कृतीवर नवा प्रकाशझोत.

● हे स्तंभ म्हणजे महापाषाण संस्कृतीमधील मृतांची स्मारके.

● एकाश्मस्तंभ स्मारके ही मानवनिर्मित सर्वात प्राचीन स्मारके

● महापाषाण संस्कृतीचा कालावधी अंदाजे इ.स.पू. १४०० ते ५००.

● महापाषाण संस्कृतीमधील एकाश्मस्तंभ स्मारके ही मानवनिर्मित सर्वात प्राचीन स्मारके म्हणून ओळख

● महाराष्ट्रात विदर्भातील चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यात आढळली एकाश्मस्तंभ स्मारके

● कर्नाटक, तेलंगण, आंध्र, तामिळनाडु, मणिपूर राज्यातही अशी एकाश्मस्तंभ स्मारके

● इंग्लंड, आयर्लंड, फ्रान्स, झेक प्रजासत्ताक देशांमध्ये आढळली एकाश्मस्तंभ स्मारके

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In sindhudurg seven monolith monuments found in kumbhavade village rajapur css