पंढरपूर : सोलापूर जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपले आहे. करमाळा तालुक्यात काही ठिकाणी ढगसदृश पावसाने हजेरी लावली. त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले, तर सोलापूर शहरात देखील पावसाने सखल भागात पाणी साचल्याची घटना घडली. ग्रामीण भागात या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ओढे, नाले पाण्याने भरले आहेत. पुढील तीन दिवस पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. आता पावसाने उघडीप द्यावी, अशी याचना बळीराजा करत आहे.

सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. करमाळा तालुक्यातील कोर्टी या गावात ढगफुटीसदृश पावसाने हजेरी लावली. यामुळे कोर्टी गावातील घर, कार्यालयात पाणी शिरल्याची घटना घडली. तसेच ओढे, नाले भरून वाहू लागल्याने काही गावांचा संपर्क काही वेळासाठी तुटला होता. तसेच शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील दक्षिण, उत्तर सोलापूर, अक्कलकोट येथे देखील पावसाने हजेरी लावली आहे. सोलापूर शहरात पावसाने पुन्हा एकदा सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या. या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले.

शहरात जवळपास २० हजार घरांना या पावसाचा फटका बसला आहे. तसेच संसार उपयोगी साहित्य वाहून गेले आहे. शहरातील नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी मनपा आणि महसूल विभागाची २४ पथके नियुक्त केली आहेत. पावसामुळे ज्यांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले आहे त्या सर्व बाधितांचे पंचनामे केले जाणार आहेत. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांनी केले आहे.

पंढरपूर तालुक्यात देखील पावसाने चांगली हजेरी लावली. दिवसा थोडे सूर्यदर्शन झाले. मात्र त्या नंतर ढगाळ वातावरण दिसून आले. संध्याकाळी काही वेळ पावसाची संततधार होती. तर रात्री देखील पावसाने हजेरी लावली. सोमवारी मात्र दिवसभर ऊन होते. मात्र सायंकाळी पुन्ह ढग दाटून आले होते. या पावसाने पंढरपुरात आलेल्या भाविकांसह नागरिकांची तारांबळ उडाली. दरम्यान, या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. उडीद, सोयबीन, तुूर, कांदा आदी पिकांना पाणी जास्त झाल्याने कुजण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच द्राक्ष, डाळिंब, पेरू या सह फळबागांना रोगराईचा प्रादुर्भाव वाढला आहे. ग्रामीण भागातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत. हवामान विभागाने १८ सप्टेंबरपर्यंत सोलापूरला यलो अलर्ट दिला आहे. प्रशासनाने आपत्ती यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या असून नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन केले आहे.