​सावंतवाडी : सोळाव्या शतकापासून उज्ज्वल परंपरा लाभलेल्या सावंतवाडी संस्थानाच्या प्रसिद्ध “गंजिफा” कलेला भारतीय टपाल विभागाने विशेष पोस्ट तिकिटावर (पोस्ट कार्डवर) स्थान देऊन गौरव केला आहे. या पोस्ट कार्डवर गंजिफा कलेतील दशावतार कलेचा सन्मान करण्यात आला आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच चौकोनी नसून गोलाकार स्वरूपातील पोस्ट कार्ड या निमित्ताने प्रसिद्ध करण्यात आले आहे.

​हा ऐतिहासिक सोहळा मुंबई येथे पार पडला. यावेळी सावंतवाडी संस्थांनचे राजे खेम सावंत भोसले, राणी शुभदादेवी भोसले, युवराज लखमराजे भोसले आणि युवराज्ञी श्रध्दाराणी भोसले उपस्थित होते.

​युवराज लखमराजे भोसले यांनी माहिती देताना सांगितले की, या गोलाकार पोस्ट कार्डमध्ये सावंतवाडीच्या प्रसिद्ध गंजिफाचा समावेश आहे. आता गंजिफाच्या स्वरूपात असलेले हे पोस्ट कार्ड देश-विदेशात जाणार असून, त्या माध्यमातून सावंतवाडीची गंजिफा कला साता समुद्रापार पोहोचणार आहे. ही सावंतवाडीसाठी अत्यंत कौतुकाची बाब आहे. नव्या पोस्टकार्डवर दशावताराचे गंजिफाचे सादरीकरण करण्यात आलेले असून, यामुळे दशावताराला देखील प्रोत्साहन मिळणार आहे.

​राजघराण्याचे कला संवर्धनात मोलाचे योगदान

​सोळाव्या शतकात भारतात आलेली गंजिफा कला सावंतवाडी संस्थानच्या माध्यमातून आजही जोपासली जात आहे. राजे श्रीमंत शिवरामराजे भोसले आणि राणी श्रीमंत सत्वशिलादेवी भोसले यांनी गंजिफा खजाना समजून त्याचे संवर्धन केले. राजघराणे गंजिफा कलावंतांच्या माध्यमातून हा वारसा जोपासत आहे.

राजघराण्याकडून सावंतवाडी राजवाडा येथे गंजिफा कलावंतांचे कौतुक करत सन्मान करण्यात आला. मोहन कुलकर्णी, सदाशिव धुरी, पांडुरंग धुरी, रामचंद्र ठाकूर, वर्षा लोंढे, विश्वनाथ कुलकर्णी, लाडू ठाकूर, गायत्री कुलकर्णी, सुकन्या पवार, गौरी पारकर, आर्या देवरूखकर, सोनाली कुंभार, यश धुरी, भुवन हळसकर, निकिता आराबेकर, सचिन कुलकर्णी या कलावंतांचा गौरव करण्यात आला.

​ज्येष्ठ गंजिफा कलावंत मोहन कुलकर्णी यांनी या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त करत, हा सावंतवाडीच्या कला-संस्कृतीचा, परंपरेचा आणि कलाकारांच्या मेहनतीचा गौरव असल्याचे म्हटले.

​सौ .शुभदादेवी भोसले यांनी राजेसाहेब शिवरामराजे भोसले आणि राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांच्या प्रयत्नांमुळे ही कला देशोदेशी पोहोचणार असल्याचे नमूद केले. तसेच त्यांनी गंजिफा कलावंतांना सरकारने राजाश्रय द्यावा, अशी मागणीही केली.

​युवराज्ञी श्रद्धाराणी भोसले यांनी सांगितले की, या पोस्टकार्डवर दशावतार गंजिफा कलेचे सुंदर सादरीकरण असून, यातून कृष्णाचे दहा अवतार बघायला मिळणार आहेत. यामुळे येणाऱ्या पिढीला आपली संस्कृती, परंपरा देखील समजणार आहे.

​सर्व स्तरातून अभिनंदन

​या गौरवशाली यशाबद्दल श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्यावतीने राजघराण्याचे अभिनंदन करण्यात आले. या गौरवामुळे सावंतवाडीची कला-संस्कृती सातासमुद्रापार पोहोचणार असल्याचा अभिमान प्राध्यापकांनी व्यक्त केला.

​यावेळी श्रीमंत खेमसावंत भोंसले, सौ .शुभदादेवी, युवराज लखमराजे भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराणी भोंसले यांच्यासह संस्थेचे डॉ. सतीश सावंत, जयप्रकाश सावंत, प्रा. जी.एम शिरोडकर, प्राचार्य डॉ. डी एल भारमल तसेच एसपीके महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

गंजीफा

एक प्राचीन भारतीय कला आणि पत्त्यांचा खेळ : गंजीफा हा एक भारतीय पत्त्यांचा खेळ आणि एक पारंपरिक कला प्रकार आहे, हा खेळ राजे महाराजे खेळत तो सावंतवाडी संस्थानच्या राजघराण्याने जिवंत ठेवला.

धार्मिक संबंध: दशावतार गंजिफा या प्रकारात विष्णूच्या दहा अवतारांचे चित्रण असते आणि हा एक पवित्र खेळ मानला जातो, जो देवांच्या नामस्मरणाची एक उत्तम पद्धत आहे.