सातारा: राजवाडा परिसरातील सर्वे नंबर २७० म्हणजेच जुन्या जनावरांच्या दवाखान्याची जागा लवकरच सातारा पालिकेकडे हस्तांतरित होणार आहे. राजवाडा परिसरातील वाहनतळाचा प्रश्न सोडवणारा बहुमजली प्रकल्प तसेच अद्ययावत स्वरूपाची खाऊगल्ली बोट टेरेसवर कॅफेटेरिया असा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आकार घेत आहे. या प्रकल्पाला तब्बल ५० कोटी रुपयांचा खर्च होणार आहेत याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या भांडवली खर्च निधीमधून हा प्रकल्प आकार घेत आहे. सातारा पालिकेने याबाबतची निविदा अंतिम केली असून लवकरच ठेकेदाराच्या माध्यमातून हे काम सुरू होणार आहे. राजवाडा परिसरातील जुन्या जनावरांची जागा ही सातारा जिल्हा परिषदेच्या मालकीची आहे. या जागेसाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सातारा नगरपालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. सातारा शहरातील विशेषतः राजवाडा परिसरातील वाहतुकीची कोंडी व पार्किंगचा प्रश्न सोडवण्यासाठी जुन्या जनावरांच्या दवाखान्याच्या जागेत तीन मजली वाहनतळाची इमारत उभी राहणार आहे. पहिल्या मजल्यावर हॉकर्ससाठी खाऊ गल्लीवरच्या दोन मजल्यावर चार वाहनांसाठी प्रशस्त पार्किंग तळ आणि टेरेसवर स्वतंत्र कॅफेटेरिया उभारला जाणार आहे.
बेसमेंटमध्ये दीडशे दुचाकी बसतील इतकी प्रशस्त जागा उपलब्ध होणार आहे. अडीचशे वाहनांचे दुमजली पार्किंग तळ उभे केले जाणार आहे.
राजवाड्यासमोरील चौपाटीचे या जागेमध्ये लवकरच स्थलांतरण होणार आहे. त्यामुळे राजवाडा परिसर हा मोकळा राहणार आहे. तेथे स्वतंत्र लँडस्केप विकसित केले जाणार आहे. मुंबई येथील एमएमए आर्किटेक्ट्स संस्थेकडून या प्रकल्पाचा मानक नकाशा तयार करण्यात आला आहे, याची पाहणी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सोमवारी सकाळी केली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम, माजी नगराध्यक्ष अशोक मोरे, माजी उपनगराध्यक्ष जयंत चव्हाण, अमोल मोहिते, पालिकेचे अभियंता दिलीप चिद्रे, नगर अभियंता प्रतीक वैराट तसेच ठेकेदार कंपनीचे सदस्य उपस्थित होते.
वृक्षराजी वाचवणार
भवानी पेठ सातारा जिल्हा परिषदेच्या मालकीचा जुना जनावरांचा दवाखाना हा जवळपास पावणे दोन एकरामध्ये पसरलेला आहे. या दवाखाना परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर जुनी झाडे आहेत. ही झाडे कशा पद्धतीने वाचवता येतील आणि त्यांना धक्का न लावता बहुमली वाहनतळ इमारत कशी उभी करायची त्याच्या स्पष्ट सूचना ठेकेदार कंपनीला देण्यात आलेल्या आहेत, असे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले. येथील जनावरांचा जुना दवाखाना अन्यत्र हलवण्यात येणार असून पालिकेकडून ही इमारत स्वतंत्ररीत्या बांधून दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.