जालना : जिल्ह्यातील बदनापूर, भोकरदन, जाफराबाद आणि जालना या चार तालुक्यांत ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरा’ योजनेअंतर्गत शेडनेट गृह उभारणीत झालेल्या गैरप्रकाराच्या तपासणीसाठी बाहेरच्या वरिष्ठ कृषी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील ३८ पथके जालना जिल्ह्यात दाखल झालेली आहेत.

२१ जून रोजी दाखल झालेली ही पथके २८ जून २०२५ पर्यंत तपासणी करून गैरप्रकाराच्या संदर्भातील अहवाल शासनास सादर करणार आहेत. नांदेड, धाराशीव, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि परभणी जिल्ह्यांतील कृषी उपसंचालक त्याचप्रमाणे उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांचा या तपासणी पथकांत समावेश आहे. १५६ गावांतील शेडनेटगृह उभारणीच्या संदर्भातील ही चौकशी आहे.

शेडनेट गृह उभारणीतील तक्रारींच्या अनुषंगाने ‘पोकरा’ च्या मुंबई कार्यालयातील दक्षता पथकाने यापूर्वी २८ डिसेंबर २०२३ रोजी तपासणी अहवाल सादर केला होता. त्यानंतर या योजनेच्या प्रकल्प संचालकांनी ५ जुलै २०२४ रोजी लेखा परीक्षण अहवाल सादर केला. या योजनेतील वसूलपात्र रक्कम पाहता संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदविण्याचे आदेश कृषी आयुक्तांनी २६ सप्टेंबर २०२४ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील कृषी सहसंचालकांना दिले होते. परंतु, १० ऑक्टोबर २०२४ रोजी मंत्रालयातून विभागीय चौकशी पूर्ण होईपर्यंत गुन्हे नोंदविण्याच्या आदेशास स्थगिती देण्यात आली. त्यानंतर विभागीय चौकशीचे काम रेंगाळले होते. आता या चौकशीसाठी १८ अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वाखाली ३८ पथके जिल्ह्यात दाखल झालेली आहेत. यापूर्वी एका उपविभागीय कृषी अधिकाऱ्याचे निलंबन यासंदर्भात झालेले आहे.

चौकशीची व्याप्ती वाढणार

शेडनेटगृह उभारणीच्या संदर्भात ३ हजार २५६ प्रकरणांत चार तालुक्यांतील १५६ गावांत चौकशी केली जात आहे. जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांतील जवळपास एक हजार शेडनेटगृहांची चौकशीही पुढील काळात करण्यात येणार आहे. २०२०-२०२१ आणि २०२२-२०२३ या काळातील ही चौकशी आहे. – पी. आर. देशमुख, कृषी सहसंचालक, विभागीय, छत्रपती संभाजीनगर.

मोठा गैरप्रकार

जिल्ह्यात शेडनेटगृहांना अनुदान वितरित करताना त्याचप्रमाणे गोदामे, शेतमाल संकलन केंद्र, औजार बँक इत्यादींच्या संदर्भात ‘पोकरा’ योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाला आहे. ‘पोकरा’च्या मुंबई कार्यालयातील दक्षता पथकाने काही शेडनेटगृहांच्या केलेल्या तपासणीत ५६ लाख गैरप्रकार आढळून आले आहेत. विभागीय चौकशीनंतर यावर प्रकाश पडेल. – सुरेश गवळी, तक्रारदार, जाफराबाद.