Jayant Patil in Sangli : सांगली जिल्ह्यातील मिरज येथील ऐतवडे गावात पार पडलेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूरचे आमदार जयंत पाटील सहभागी झाले होते. भाजपा आमदार गोपीचंद पडळकरही या कार्यक्रमाला उपस्थित होते. दोन्ही नेत्यांनी या कार्यक्रमात भाषण केलं. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना जयंत पाटील म्हणाले, “काही लोक आपल्या समाजाचा नेता होण्यासाठी इतर समाजांना शिव्या देण्याचं काम करतात. आधीच देशात व राज्यात जाती-जातींमधील द्वेष वाढलेला असताना ही मंडळी लोकांमध्ये आणखी फूट पाडण्याचं काम करत आहेत. दुसऱ्यांना शिव्या देऊन आपण मोठे होऊ शकत नाही ही खुणगाठ या सर्व मंडळींनी बांधून घेतली पाहिजे”. पाटलांनी त्यांच्या भाषणात कोणाचंही नाव घेतलेलं नसलं तरी त्यांचा रोख गोपीचंद पडळकरांकडे असल्याची कुजबूज चालू होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जयंत पाटील म्हणाले, “अलीकडे वेगवेगळ्या समाजांचा द्वेष करण्याची फॅशन सुरू झाली आहे. आपल्या समाजात आपले नेतृत्व वाढवण्यासाठी दुसऱ्या समाजांना शिव्या देणे, इतर समाजाच्या नेत्यांना शिव्या देणे, ही पद्धत आता सुरू झाली आहे. असं वागल्यानंतर त्याच्या समाजातील लोक त्याला डोक्यावर घेतात आणि मग तो त्या समाजाचा नेता होतो. दुर्दैवाने आपल्या देशात, आपल्या महाराष्ट्रात असं पाहायला मिळतंय. दुसऱ्यांच्या समाजाला शिव्या दिल्या की आपण मोठे होऊ असं काहींना वाटतं. परंतु, असं काही होत नाही हे काहींच्या लक्षात आलेलं नाही”.

दुसऱ्यांना शिव्या देऊन आपण मोठे होऊ शकत नाही : जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले, “दुसऱ्याची रेष लहान करण्यापेक्षा आपली रेष कशी मोठी करता येईल याचा विचार करायला हवा. आपली रेष मोठी केली तरच आपण मोठे होऊ शकतो, हे काहींना अजून समजलेलं नाही. दुसऱ्यांना शिव्या देऊन आपण मोठे होऊ शकत नाही ही खुणगाठ सगळ्यांनी बांधून घेतली पाहिजे. परंतु, दुर्दैवाने आज आपल्या देशात, राज्यात जाती जातीत द्वेष पसरू लागला आहे. गुण्यागोविंदाने राहणारे आपण लोक हल्ली एकमेकांचा द्वेष करू लागलेलो आहोत. यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली आपण सर्वजण गुण्यागोविंदाने राहत होतो. परंतु, आता जाती जातीतला द्वेष वाढला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayant patil says some people insult other communities to become leaders of their caste asc