Jitendra Awhad on Extra Voters : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांनी ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप केला. तसंच, ते विजयी का ठरले याची सविस्तर माहितीच त्यांनी दिली होती. आता जितेंद्र आव्हाडांनी वाढलेल्या मतदारांचा मुद्दा उपस्थित केलाय. यावेळी त्यांनी वाढलेल्या मतदारांच्या घोटाळ्याचं गणितच एक्सवर मांडलंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “महाराष्ट्राच्या निवडणुकीतील आकडेवारी जुळता जुळेना ! निवडणूक आयोगानुसार, महाराष्ट्रातील एकूण मतदार ९, ६४,८५,७६५ आहेत आणि यंदा मतदानाची टक्केवारी ६५.०२% होती. साधे गणित आह, ६५.०२ टक्के भागिले ९ ६४, ८५, ७६५ = ६, २७, ३५, ०४४.४ परंतु ECI ने ६,४०,८८,१९५ लोकांनी मतदान केल्याची नोंद केली आहे. यात अतिरिक्त १३ लाख ५३ हजार १५१ मते आहेत.”

“इतकेच नाही, तर ६५.०२ टक्के केल्यास त्यात ०.४ मतं असं गणित येतं. राज्यातच काय, संपूर्ण विश्वात अपूर्णांक मतं कशी असू शकतात?”, असा सवालही जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला.

हेही वाचा >> Maharashtra Government Formation : मोठी बातमी! राज्यात सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा, ‘या’ दिवशी शपथविधी; वेळ आणि ठिकाणही घोषित!

महाराष्ट्रात मतदार वाढीचा दर ८४ लाख?

१३ लाख अतिरिक्त मते आली कुठून? आता मतदार नोंदणी पाहू. २०१९ ते २०२४ (५ वर्षे) महाराष्ट्रातील मतदारांची संख्या ५० लाखांनी वाढली, म्हणजे सरासरी प्रतिवर्षी १० लाख. पण २०२४ च्या सार्वत्रिक आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान अवघ्या ६ महिन्यांत मतदारांची संख्या ४२ लाखांनी वाढली. ६ महिन्यांत ४२ लाख वाढ म्हणजे ८४ लाख/वर्षाचा वाढीचा दर, जो गेल्या ५ वर्षांतील सरासरी वार्षिक दराच्या ८.४ पट आहे!”, हे स्पष्टीकरणही जितेंद्र आव्हाडांनी दिलं.

“हा मतदार नोंदणीचा चमत्कार आहे की मतांमध्ये फेरफार आहे, हे तुम्हीच ठरवा. मतांमधील या विसंगती दोन गंभीर प्रश्न निर्माण करतात: १. मतं वाढवण्यासाठी ईव्हीएममध्ये छेडछाड केली का?, २. ECI चुकीचा किंवा फेरफार केलेला डेटा प्रकाशित करत आहे का? दोघांपैकी काही जरी झालं असेल, तरी हा प्रकार निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कमी करतोय”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“निवडणूक आयोगाने स्पष्ट केले पाहिजे की १३ लाख अतिरिक्त मते का आहेत? – महाराष्ट्रात ६ महिन्यांत ४२ लाख मतदार कसे वाढले? – ईव्हीएमचे स्वतंत्र ऑडिट केले जात आहे का? लोकशाही ही लोकांच्या विश्वासावर अवलंबून असते. हे प्रश्न अनुत्तरीत राहिल्यास त्यावरून नक्कीच विश्वास उडेल. मतदार नोंदणी आणि मतमोजणीत पारदर्शकता आणावी अशी आमची मागणी आहे. लपवण्यासारखे काहीही नसेल, तर ECI ने या तपासणीचे स्वागत केले पाहिजे. आपल्या लोकशाहीच्या पायाचे रक्षण करण्याची प्रचंड गरज आज आहे”, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad on extra voters in maharashtra assembly election result 2024 sgk