बारामती येथील सभेत जनतेल संबोधित करताना अजित पवारांनी शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका केली होती. शेवटची निवडणूक आहे असं सांगून मते मागितली जातील, परंतु, त्यांच्या भावनिक मागणीला बळी पडू नका, असं आवाहन अजित पवारांनी केलं होतं. अजित पवारांच्या या वक्तव्यावरून अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झालं आहे. आपल्या वक्तव्याप्रकरणी अजित पवारांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी या स्पष्टीकरणाला प्रत्युत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार बारामतीच्या भाषणात काय म्हणाले होते?

“उद्या जेव्हा खासदारकीच्या निवडणुका येतील. मी उमेदवार जाहीर करेन, तिथे मी उभा आहे (अजित पवार) असं समजून मतं द्या हे मी तुम्हाला सांगतो. कुणी भावनिक होतील. आमची शेवटची निवडणूक आहे म्हणतील. अमकंच आहे, तमकंच आहे म्हणतील. त्यांची शेवटची निवडणूक कधी होणार आहे माहीत नाही. पण, तुम्ही भावनिक होऊ नका अशी माझी विनंती आहे”, असं अजित पवार म्हणाले होते.

हेही वाचा >> “ज्येष्ठ नेत्यांनी शारीरिक दगदगीचा विचार करावा, म्हणून…”, ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण

अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांना टोला लगावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यामुळे शरद पवार गटातील नेत्यांनी याविरोधात टीका केली. “एखाद्या माणसाच्या मृत्यूची वाट पाहणं कितपत योग्य आहे, अजित पवारांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत”, अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली. तसंच, अनेक नेत्यांनीही अजित पवारांवर टीकास्र डागलं. यावरून अजित पवारांनी त्यांची भूमिका एक्सवरून स्पष्ट केली.

टीका झाल्यानंतर अजित पवारांनी काय स्पष्टीकरण दिलं?

“काल माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. माझं पहिल्यापासून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असल्यापासून एवढंच म्हणणं होतं की, ज्येष्ठ नेत्यांनी शारीरिक दगदगीचा विचार करावा आणि प्रकृतीची काळजी घ्यावी. हे मत मी पूर्वी देखील मांडलेलं आहे. मात्र काही लोक स्वतःच्या राजकारणासाठी ज्येष्ठ नेत्यांचा वापर करू पाहतात. त्यांना ह्या गोष्टी कळणार नाहीत. माझ्या त्यांच्याबद्दलच्या भावना मी वेळोवेळी मांडलेल्या आहेत. पण काही लोकांना ‘ध’ चा ‘मा’ करायची सवयच असते, अशा नाटकीबाज लोकांना मी महत्त्व देत नाही. मात्र सर्वसामान्य लोकांना माझ्या भावना कळाव्यात, म्हणून मी हे म्हणणं मांडत आहे”, असं अजित पवार म्हणाले.

हेही वाचा >> “आमची शेवटची निवडणूक आहे समजून…”, अजित पवारांकडून बारामतीकरांना विनंती

जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर काय?

“नाटकी लोकांना किंमत देत नाही तर खुलासा कशाला करता आहात? साहेबांच्या नावाचा फायदा तुम्हाला किती झाला हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा. तुमच्या मनातले तोंडात आले आणि महाराष्ट्राला सत्य कळले, जाऊ द्या कधी तरी खरा चेहरा बाहेर येतोच. नाहीतर तुम्ही इतकी सारवासारव केली नसती आणि हो कावळ्याच्या शापानी गाय मरत नसते”, असं प्रत्युत्तर आव्हाडांनी दिलं.

जितेंद्र आव्हाडांच्या या टीकेवर अजित पवार आता काय उत्तर देतात हे पाहावं लागेल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad sharp reply on ajit pawar statement on sharad pawar sgk
First published on: 05-02-2024 at 21:02 IST