राज्यात सुरु असणाऱ्या मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्याला आता उत्तर प्रदेशमध्ये ११ हजारांहून अधिक धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आल्याच्या मुद्द्याच्या फोडणी मिळालीय. ११ हजार भोंगे काढण्याबरोबरच उत्तर प्रदेशात ३५ हजारांहून अधिक ठिकाणी भोंग्यांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्याचं निश्चित करण्यात आलंय. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचं अभिनंदन केलंय. मात्र उत्तर प्रदेशमधील या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आता राज्यात पुन्हा एकदा सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष दिसून येण्यास सुरुवात झालीय. उत्तर प्रदेशमधील भोंगा हटवा मोहिमेनंतर राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीने उडी घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षरित्या टीका केलीय. मात्र या टीकेननंतर आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पलटवार करत निशाणा साधलाय. मात्र आव्हाड यांनी केलेली टीका नेमकी राज ठाकरेंसाठी आहे की अमृता फडणवीसांसाठी हे गुलदस्त्यातच आहे.

नक्की वाचा >> योगी सरकारने ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे काढल्यासंदर्भात अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आपण महाराष्ट्रात…”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उत्तर प्रदेशात नेमकं घडलंय काय?
उत्तर प्रदेशमधील ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले आहेत. तर ३५ हजार धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसाठी आवाजाची मर्यादा निश्चित करुन देण्यात आली आहे. मागील चार दिवसांमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली असल्याची माहिती राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी दिली. राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत भोंग्यांच्या आवाजासंदर्भात तातडीने कारवाई करण्यासंदर्भातील निर्देश जिल्हास्तरीय प्रशासनाला दिल्यानंतर राज्यात भोंग्याविरोधातील मोहीम सुरु करण्यात आलीय. “राज्यभरामध्ये धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवणे तसेच त्यांच्या आवाजाची मर्यादा निश्चित करण्याची मोहीम हाती घेण्यात आलीय. याच अंतर्गत एकूण १० हजार ९२३ भोंगे हटवण्यात आलेत. तर ३५ हजार २२१ भोंग्यांच्या आवाजाला मर्यादा घालून देण्यात आलीय,” असं अतिरिक्त निर्देशक सचिव (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी म्हटलंय.

योगींच्या निर्देशानंतर कारवाई
मागील आठवड्यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या विषयासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये योगी आदित्यनाथ यांनी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या धार्मिक मान्यतांचं पालन करण्याचा अधिकार आहे. मात्र त्याचा दुसऱ्यांना त्रास होणार नाही याचीही काळजी घेतली गेली पाहिजे, असं मत व्यक्त केलेलं. “भोंगे वापरण्याला हरकत नाही. मात्र भोंग्यांचा आवाज त्या धार्मिक स्थळांच्या आवातापुरता मर्यादित राहील याची काळजी घ्या. याचा इतर लोकांना काही त्रास होता कामा नये,” असं योगी बैठकीमध्ये म्हणाले होते. यानंतर गृह विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत हिंदू आणि मुस्लीम धर्मीय नेत्यांनी चर्चा केली. या चर्चेदरम्यान हिंदू आणि मुस्लीम दोन्ही समाजाच्या धार्मिक नेत्यांनी भोंग्यांचा आवाज कमी करण्यावर सहमती दर्शवली.

नक्की वाचा >> केंद्र सरकारकडून २६ हजार ५०० कोटींची जीएसटीची थकबाकी मिळाल्यानंतर…; फडणवीसांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना थेट सवाल

राज ठाकरेंकडून कौतुक
राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत असणाऱ्या योगी आदित्यनाथ सरकारवर कौतुकाचा वर्षाव केलाय. मात्र त्याच वेळी त्यांनी महाराष्ट्रामध्ये सत्तेत असणाऱ्या ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय. योगी सरकारच्या या निर्णयावर सोशल मीडियावरुन व्यक्त होताना राज यांनी एक पोस्ट केलीय. यामध्ये राज यांनी, “उत्तर प्रदेशमधील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार,” असं म्हटलंय. पुढे बोलताना राज यांनी, ठाकरे सरकावर निशाणा साधलाय. “आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’!”, असं म्हटलंय. तर पोस्टच्या शेवटच्या ओळीत राज यांनी, “महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना,” असंही म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “१२ वाजता उठणाऱ्याने अजित पवारांवर टीका केली म्हणून…”; राष्ट्रवादीचा राज ठाकरेंना टोला

अमृता फडणवीसांनी लगावला टोला
राज ठाकरे यांनी राज्यातील सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना राज्यातील राज्यकर्ते हे भोगी असल्याचा टोला लगावला आहे. याच टीकेचा आधार घेत अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरुन राज्यातील महाविकास आघाडी सरकारला आणि अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. “ऐ ‘भोगी’ काहीतरी शिक आमच्या ‘योगीं’कडून”, असं ट्विट अमृता यांनी केलंय. यामध्ये त्यांनी महाराष्ट्र हा हॅशटॅग वापरला आहे.

आव्हाड यांचा पलटवार…
गुरुवारी दिवसभर सुरु असणाऱ्या याच आरोप प्रत्यारोपांचा धागा पकडत रात्री ११ वाजून ५३ मिनिटांनी एक जीफ फाइल शेअर करत मोजक्या शब्दात या टीकेवर भाष्य केलंय. आरडाओरड करणाऱ्या व्यक्तीची जीफ शेअर करत आव्हाड यांनी, “कोणी योगी आहे, कोणी भोगी आहे तर कुणी मानसिक रोगी आहे,” असं म्हटलंय. आता योगी आणि भोगी या कोट्या करत राज ठाकरे आणि अमृता फडणवीस या दोघांनीही गुरुवारी ठाकरे सरकारवर निशाणा साधला होता. पण मग आव्हाडांनी केलेली टीका हे नेमकी कोणावर आहे यासंदर्भात कमेंटमध्ये चर्चा सुरु असल्याचं दिसतंय.

मंदिरं आणि मशिदींनीही घेता पुढाकार…
दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येमधील मंदिरांपासून ते अगदी लखनऊमधील शिया मशिदींपर्यंत सर्वांनीच यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतल्याचं दिसतंय. मथुरेमधील श्री कृष्ण जन्मभूमी मंदिराने रोज पहाटे पाच वाजता भोंग्यावरुन म्हटली जाणारी मंगल चरण आरती भोंग्यावर न वाजवण्याचा निर्णय घेतला. भागवत भवन येते श्री कृष्ण जन्मभूमीच्या आवारामध्ये रोज पहाटे पाच वाजता भोंग्यावरुन एक तास आरती ऐकवली जायची. अशाच प्रकारे अयोध्येसहीत इतर शहरांमधून प्रतिसाद मिळत असून अनेकांनी स्वइच्छेने आवाजावर मर्यादा घालण्याचा निर्णय घेतलाय.

नक्की वाचा >> इंधनावरील कर कमी करण्याच्या मोदींच्या सल्ल्यावर अर्थमंत्री अजित पवार म्हणाले, “केंद्र सरकारने देखील पेट्रोल-डिझेलवर कर लावताना…”

लखनऊमधील इदगाहचे इमाम असणाऱ्या मौलाना खलिद रशिद फिरंगी महाली यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर सर्व सुन्नी मशिदींना भोंग्यांचे आवाज कमी करण्याचे निर्देश दिल्याचं म्हटलंय. “आम्ही सर्व मशिदींमधील भोंग्यांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश दिले असून आवाज मशिदीबाहेर येणार नाही याची काळजी घेण्यास सांगितलंय,” असं इमाम म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad slams amruta fadnavis raj thackeray with reference to yogi adityanath government loudspeakers removal scsg